बाला देवीला महिला डर्बीची अपेक्षा


25th November 2020, 11:10 pm

पणजी : सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेतील (आयएसएल) पहिल्यावहिल्या कोलकाता डर्बीची उत्कंठा शिगेला पोचली असताना नामवंत महिला फुटबॉलपटू बाला देवी हिने महिलांसाठीही अशी डर्बी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
भारतीय फुटबॉलमध्ये शुक्रवारी होणाऱ्या या लढतीची चर्चा रंगली आहे. गेल्या काही काळातील ही सर्वांत महत्त्वाची कोलकाता डर्बी मानली जात आहे. भारतीय फुटबॉलमधील या सर्वोच्च प्रतिष्ठेच्या लढतीने सर्वाधिक महत्त्वाच्या व्यासपीठावर स्थान मिळविले आहे.
भारतात सगळीकडे फुटबॉलप्रेमी आतूर झाले असताना स्कॉटलंडमध्ये खेळणाऱ्या बाला देवी हिलाही वेध लागले आहेत. ती अशा खास लढतीची कल्पना रंगवते आहे. एटीके मोहन बागान आणि एससी ईस्ट बंगाल महिला डर्बीसाठी सुद्धा एके दिवशी अशीच निष्ठा प्रदर्शित करतील, असे तिला वाटते.
बाला देवी अलिकडे रेंजर्स एफसी आणि सेल्टिक एफसी या लढतीत सहभागी झाली, ज्यास ओल्ड फर्म डर्बी असे संबोधले जाते. जागतिक फुटबॉलमधील ही एक सर्वाधिक जुनी डर्बी मानली जाते. हे दोन क्लब महिला संघसुद्धा स्थापन करतील आणि भारतात आणखी एक प्रतिष्ठेच्या डर्बीची पर्वणी देतील, असा तिला विश्वास आहे.
स्कॉटलंडमध्ये एक फुटबॉलपटू म्हणून बाला देवी प्रगती करीत आहे. त्याचवेळी भारतीय फुटबॉलला आत्मसात करता येतील असे बहुमोल धडेही ती गिरवते आहे. स्कॉटलंडमधील महिला लिगमध्ये व्यापक बदल झाले आहेत. अशावेळी बाला देवीने तेथे प्रवेश केला आहे. २०१८ मध्ये महिला फुटबॉलशी संबंधित घटकांनी पुढे पाऊल टाकण्याचे एकमताने ठरविले. त्यानंतर नव्या संघांची स्थापना करण्यात आली.
बाला देवी हिने रेंजर्स एफसीबरोबर करार केला. परदेशात व्यावसायिक फुटबॉल करार केलेली ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली. जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये बाला देवी वाटचाल करत आहे. रेंजर्ससारख्या जगप्रसिद्ध क्लबकडून खेळत असल्यामुळे मिळणाऱ्या स्टारपदाची तिला हळूहळू सवय होत आहे. लोक मला नेहमीच सामन्यासाठी शुभेच्छा देतात. आयब्रॉक्स स्टेडियमवर माझे छायाचित्रही लावण्यात आले आहे. येथे फुटबॉलविषयी लोकांना अपार आदर वाटतो. प्रत्येक सत्रात पूर्ण ४५ मिनिटे ते उभे राहून सामना बघतात. त्यावरून त्यांचे संघांवर किती प्रेम आहे आणि ते खेळाडूंना किती प्रेरित करतात हे दिसून येते.