महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात तूर्त नवी नियमावली नाही : मुख्यमंत्री

जानेवारीपर्यंत करोनावरील लस शक्य; पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर दिली माहिती

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th November 2020, 11:44 pm
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात तूर्त नवी नियमावली नाही : मुख्यमंत्री

पणजी : गोव्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्राप्रमाणे कोणतीही नियमावली तूर्त जारी केली जाणार नाही. पण विमानतळ, रेल्वे स्थानके तसेच हॉटेलांमध्ये थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर सक्तीचे केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांत सध्या करोनाबाधितांत वाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मंगळवारी सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोना प्रसार रोखण्याबाबत चर्चा केली. शिवाय महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. जानेवारीपर्यंत करोनावरील देशी किंवा विदेशी औषध उपलब्ध होणे शक्य आहे. पण देशातील जी राज्ये करोनावरील लस तयार करीत आहेत, अशांनी लसीच्या तयारीबाबतची माहिती केंद्राला लेखी देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. करोनाचे औषध आल्यानंतर ते सर्वच राज्यांपर्यंत कशाप्रकारे वितरित करायचे याबाबतही बैठकीत चर्चा झाली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत काही देशांमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याचवेळी भारतातील जास्त थंडी असलेल्या, तसेच खराब प्रदूषण असलेल्या काही राज्यांतही बाधित वाढत आहेत. गोव्यात सध्या बाधितांची संख्या कमी असली तरी पुढील दोन महिन्यांत थंडीमुळे बाधितांची संख्या वाढू शकते. त्यामुळे स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी सतर्कता बाळगणे, काळजी घेणे आणि मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतराचे पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
बाधितांची संख्या कमी होत असली तरी राज्यात मोठ्या प्रमाणात करोना चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिक तसेच पर्यटकांनी लक्षणे दिसताच तत्काळ करोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.


आरोग्य खात्याचे हॉटेल्सवर लक्ष

देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात राज्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक हॉटेलच्या व्यवस्थापनाला थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थर्मल स्क्रिनिंगमध्ये लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीची तत्काळ चाचणी करून ती बाधित असल्यास वेगळी व्यवस्था करण्यासही हॉटेल्सना सांगण्यात आले आहे. त्यासाठी आरोग्य खातेही हॉटेल्सवर लक्ष ठेवून आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.