Goan Varta News Ad

प्रतिकूल परिस्थितीतही यशाची परंपरा कायम

- व्यंकटेश प्रभुदेसाई : मुष्टिफंड आर्यन, आर्यन स्टडी सर्कल शैक्षणिक दर्जाचा मापदंड

Story: विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th November 2020, 12:06 Hrs
प्रतिकूल परिस्थितीतही यशाची परंपरा कायम

मडगाव : करोनामुळे आलेल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणाचे व्यवस्थित नियोजन केले आणि शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याकडून चांगली साथ लाभली. म्हणून आपल्या संस्थेला यशाची उज्ज्वल परंपरा सुरू ठेवता आली, असे प्रतिपादन मुष्टिफंड आर्यन उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य आणि आर्यन स्टडी सर्कलचे संस्थापक व्यंकटेश प्रभुदेसाई यांनी केले.

वर्ष २०२० खूपच अनपेक्षित घटनाक्रम घेऊन आले. सर्वच क्षेत्रांत उलथापालथ झाली. कधी न घडलेल्या, पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टी या वर्षभरात जगभरात घडल्या. कोविड-१९ महामारीमुळे जीवन जगण्याची पद्धतच बदलून गेली. नोकरी, उद्योगधंदे, व्यवसाय, शिक्षण, प्रवास, मनोरंजन आणि आरोग्य अशा साऱ्याच क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडले. महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सगळे जनजीवन ठप्प झाले आणि परस्परांत सामाजिक अंतर राखण्याची गरज निर्माण झाली. पण, साऱ्या कठीण प्रसंगांवर मात करीत सकारात्मक ऊर्जेचे द्योतक बनत ठामपणे उभे राहिलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यंकटेश प्रभुदेसाई! मुष्टिफंड आर्यन उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य आणि आर्यन स्टडी सर्कलचे संस्थापक या नात्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षातही आपली कामगिरी उत्तम बजावलेल्या प्रभुदेसाई यांनी संस्थेची यशाची परंपरा राखली. या यशाचे श्रेय आपला शिक्षक वर्ग, विद्यार्थी चमू व पालक यांना देत या तिघांनी योग्य साथ दिल्यानेच हे सारे शक्य झाले असे प्रभुदेसाई सांगतात.

गेल्या काही वर्षांत सातत्याने यशस्वी कामगिरी केलेल्या प्रभुदेसाई यांच्या या शिक्षणसंस्थेने कोविडकाळात ऑनलाईन वर्गपद्धत अवलंबिली आणि आपल्या शैक्षणिक वर्षावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. विशेष म्हणजे पालक, शिक्षकवर्ग व विद्यार्थीही नेटाने या नवीन पद्धतीचे स्वागत करीत आपापल्या जबाबदाऱ्या पाळत गेल्यामुळे जराही वेळ वाया गेला नाही आणि भविष्यातील इंजिनियर, डॉक्टर घडविणाऱ्या या शैक्षणिक मुशीतून यंदाही अव्वल दर्जाची, तल्लख बुद्धीची नवीन पिढी तयार होऊ शकली, असे प्रभुदेसाई विनयाने कबूल करतात. महामारीने जीवनक्रम विस्कळीत झाला खरा; परंतु आम्ही तोडगे व उपाय शोधून काढत मार्गक्रमण केले, असे सांगत प्रभुदेसाई आपल्या जीवनसाथी अपर्णा यांचा उल्लेख करतात. आपले विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासोबत अपर्णानेही उत्तम साथ दिल्यामुळेच यशाचे माप पदरात पडू शकले, असे प्रामाणिकपणे ते कबूल करतात. स्वत: इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर असलेल्या अपर्णा एक सर्जनशील व्यक्तिमत्त्वाच्या धनीही आहेत. अर्धांगिनीचा खंबीर पाठिंबा असल्यानेच मला माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करता आला व आजचा हा सुवर्णदिन उगवला, असे प्रभुदेसाई यांना वाटते.

ऑनलाईन शिक्षणपद्धत यशस्वी

* महामारीच्या संकटामुळे प्रत्यक्ष वर्ग घेणे अशक्य बनले. तेव्हा ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा अवलंब करीत अभ्यास पुढे नेण्यात आला. यात वेळेची प्रचंड बचत व्हायला लागली.

* विद्यार्थ्यांचा येण्याजाण्याचा वेळ वाचला. पालकांचाही त्यांना नेण्याआणण्यात खर्च होणारा वेळ वाचला. अभ्यास, सराव यांना अधिक वेळ मिळाला.

* आता तर पालकच आग्रह करू लागले आहेत, की पुढेही काही गोष्टी ऑनलाईनच ठेवल्या जाव्यात. फक्त प्रयोगशाळेलील प्रात्यक्षिके आणि अत्यंत महत्त्वाच्या बाबी वगळता इतर गोष्टी व विषयांचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीने घेतल्यास उत्तम, अशी पालकांची मागणी आहे.

संस्थेची आदर्शवत वाटचाल...

१. या वर्षभराच्या काळात अंतराळवीर राकेश शर्मा ते अंतराळविज्ञान तंत्रसल्लागार रजनीश कुमार यांच्याशी विद्यार्थ्याचा ऑनलाईन वार्तालाप संस्थेने घडवून आणला.

२. आम्ही जगभरातील विशेषज्ञांना आमंत्रित करतो, असा प्रभुदेसाई यांचा दावा आहे. आतापर्यंत ३४ व्यक्तिमत्त्वांना आमंत्रित करण्यात आले आहे. येथील १० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असतो, जो त्यांना हरप्रकारे मदत करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना सल्ला देतो.

३. सर्व परीक्षा ऑनलाईन झाल्या. १०० मॉक टेस्ट बारावीसाठी व ३० अकरावीसाठी घेण्यात आल्या. तसेच प्रॅक्टिकल घेताना सर्वप्रकारची काळजी घेण्यात येईल.

४. दहा मुलांची एक अशा तीन बॅचेस ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल, अशी हमी ते देतात. करोनावरील लस येईपर्यंत आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

५. यंदा सर्वच बाबी ऑनलाईन घेण्यात आल्या. सारे सुरळित पार पडले. आता येत्या १३ डिसेंबर रोजी संस्थेचा वार्षिकोत्सव आहे. तो देखील ऑनलाईन साजरा होणार आहे.