Goan Varta News Ad

कॉन्स्टेबलच्या १,२०० जागा डिसेंबरनंतर भरणार : मुख्यमंत्री

होमगार्ड भरतीचीही हमी; महिलांसाठी हेल्पलाईन जारी

|
23rd November 2020, 11:12 Hrs
कॉन्स्टेबलच्या १,२०० जागा डिसेंबरनंतर भरणार : मुख्यमंत्री

फोटो : महिलांसाठीच्या हेल्पलाईनचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुकेश कुमार मीना व बी. बी. नागपाल. (नारायण पिसुर्लेकर)

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : पोलिस खात्यातील कॉन्स्टेबल पदांच्या १,२०० जागांसह होमगार्डची रिक्त पदे डिसेंबरपासून भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी रिक्त पदे भरणे अत्यंत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

गोवा शिपयार्डतर्फे गोवा पोलिसांना सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान करण्यासाठी तसेच महिला आणि बाल कल्याण संचालनालय व पोलिसांनी महिला सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना व गोवा शिपयार्डचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बी. बी. नागपाल उपस्थित होते.

राज्य सरकार पोलिस खात्याला सहकार्य करत आहे. गेल्या वर्षभरात अनेक पोलिसांना बढत्या दिल्या आहेत. करोनामुळे सरकारी नोकरभरती थांबवण्यात आली होती. डिसेंबरनंतर नोकरभरती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पोलिस खात्यात रिक्त असलेली कॉन्स्टेबलची १,२०० पदेही भरण्यात येणार आहेत. शिवाय होमगार्डची पदेही तत्काळ भरली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

करोना काळात गोवा पोलिसांनी फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. अनेक पोलिस करोनाबाधित झाले; पण हार न मानता करोनाला हरविण्यासाठी ते २४ तास कार्यरत राहिले. त्यामुळेच राज्यातील करोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. याची दखल घेऊनच गोवा शिपयार्डने पोलिस खात्याला सुसज्ज रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णवाहिकेचा पोलिसांना निश्चित फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

गेल्या दोन-तीन महिन्यांत राज्यातील महिला अत्याचारांचे प्रमाण घटले आहे. भविष्यात यात वाढ होऊ नये, यासाठी महिला आणि बाल कल्याण खाते, महिला आयोग तसेच गोवा पोलिसांनी खास महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. हेल्पलाईन क्रमांकामुळे महिलांना निश्चित दिलासा मिळेल, असा दावाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला. करोना काळात गोवा पोलिसांनी केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून करोना प्रसार रोखण्यासाठी पोलिस दिवस-रात्र कार्यरत राहिले. त्यामुळेच करोना स्थिती नियंत्रणात येत आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. केंद्र सरकारकडूनही गोवा पोलिसांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची हमी त्यांनी दिली.

प्रत्येक महिलेने हेल्पलाईन क्रमांक सेव्ह करावा

महिला आणि बाल कल्याण खाते, महिला आयोग तसेच गोवा पोलिसांनी महिलांसाठी ७८७५७५६१७७ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. प्रत्येक महिला, विद्यार्थिनी तसेच पर्यटनासाठी येणार्‍या देशी-विदेशी महिलांनीही हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करावा. गरज पडेल त्यावेळी या क्रमांकाद्वारे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. महिलांवरील अत्याचार पूर्णपणे नष्ट करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यालयाची नवी इमारत लवकरच

पणजीतील पोलिस मुख्यालयाच्या नव्या इमारतीचा प्रश्न अजूनही रेंगाळलेला आहे. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. पोलिसांना मुख्यालयाची नवी सुसज्ज इमारत बांधून देण्यात येईल. त्यात आवश्यक त्या सर्व साधनसुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.