सोनसडोतील प्रक्रिया केलेला कचरा ‘जैसे थे’

- उचल करण्यासाठी कचरा व्यवस्थापनकडून हालचाल नाही : कचरा रस्त्यापर्यंत

Story: अजय लाड । मडगाव |
23rd November 2020, 12:44 am
सोनसडोतील प्रक्रिया केलेला कचरा ‘जैसे थे’

मडगाव : सोनसडो येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने ताबा घेत गेल्यावर्षीपासून बायोरेमेडिएशन प्रक्रिया सुरू केली. आता प्रक्रिया केलेले आरडीएफ अजूनही प्रकल्पाच्या ठिकाणी असून, त्याची उचल करून ते फॅक्टरींना पाठवण्यास अजूनही सुरुवात केलेली नाही. सोनसडो यार्डात कचरा रस्त्यावर आलेला असून, प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची उचल करण्यासाठी कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबाेे यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.
सोनसडो कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी पालिकेकडून गोळा करण्यात येणारा कचरा टाकण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची उचल आता लवकरात लवकर करणे आवश्यक झालेले आहे. सोनसडो यार्डातील कचऱ्याच्या ढिगावर बायोरेमेडिशन प्रक्रिया केल्यानंतर उर्वरित आरडीएफ टाकण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्याने आरडीएफ प्रकल्पाच्या ठिकाणीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रक्रिया केल्यानंतर उरणारा आरडीएफ कचरा कर्नाटकातील कंपन्यांना पाठवण्यात येतो. मात्र, मार्च महिन्यापासून करोना महामारीमुळे देशभर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आरडीएफची उचल झाली नाही व कचरा सोनसडो कचरा प्रकल्पाच्याठिकाणी पडून राहिला आहे.


पार्श्वभूमी व वस्तुस्थिती
* पावसाळ्याच्या आधीपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया करणे सुरू होते. पावसाच्या आधी काही दिवस प्लास्टिक कापडाने प्रकल्पातील कचरा झाकून ठेवण्यात आला. प्रकल्पातील जागा आधीचा कचरा व प्रक्रिया केलेल्या आरडीएफमुळे भरून गेला.
* सोनसडोतील शेडमधील मशिन्सही तांत्रिक अडचणी, वीजेच्या समस्या व इतर कारणांमुळे बंद राहिल्याने प्रकल्पाच्या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या ढिगात वाढ होत राहिली.
* आता पालिका क्षेत्रातील गोळा केला जाणारा कचरा टाकण्यासाठीही प्रकल्पाच्या ठिकाणी जागा नसल्याने प्रकल्पातील रस्त्याशेजारी कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे सोनसडोतील प्रक्रिया केलेला कचऱ्याची तत्काळ उचल करणे गरजेचे बनलेले आहे.
* सोनसडो कचरा प्रकल्पाच्या ठिकाणच्या २.३१ लाख टन कचऱ्यापैकी सुमारे ९५ हजार टन म्हणजे सुमारे ४० टक्के कचऱ्यावर बायोरेमेडिएशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर उर्वरित १.३७ लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे बाकी आहे, अशी माहिती याआधी मुख्याधिकारी आग्नेले फर्नांडिस यांनी दिली आहे.


मंत्र्यांकडून आदेशाची प्रतीक्षा
याआधी कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी ऑक्टोबर महिन्यात प्रक्रिया केल्यानंतर उरलेले आरडीएफ कंपन्यांना पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे वक्तव्य बायोमिथिनेशन प्रकल्प उभारणीसाठी जागा पाहण्यासाठी आले होते त्यावेळी केले होते. मात्र, त्याची पूर्तता आता पाऊस गेल्यानंतरही झालेली नाही. पाऊस गेलेला असल्याने पालिकेला कचरा टाकण्यासाठी होत असलेली अडचण लक्षात घेत मंत्री लोबो यांनी कचरा उचल करण्याचे आदेश दिल्यास पालिकेला कचरा टाकण्यासाठी व बायोरेमेडिशन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.


मडगाव पालिकेकडून सोनसडो येथील प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा टाकण्यास अडचण होत असल्याने गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाला आरडीएफची उचल व वाहतूक करण्याबाबत पत्र पाठवण्यात आलेली आहेत. आता कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
आग्नेलो फर्नांडिस, मुख्याधिकारी, मडगाव पालिका