आणखी एक आत्महत्त्या!

रुपेरी पडदा

Story: विद्या नाईक होर्णेकर |
22nd November 2020, 05:40 pm
आणखी एक आत्महत्त्या!

‘मौत अंजाम- ए- जिंदगी है मगर, लोग मरते है जिंदगी के लिए’ कुणी एका शायरने म्हटलेल्या या ओळींमध्ये खरे तर जीवनाचे सार लपले आहे. मात्र काळ बदलला, वेळ बदलली तशी या वाक्यातील सत्यताही कालबाह्य होते की, काय अशी शंका वाटू लागली आहे. खास करुन गेल्या वर्षभरात हिंदी चित्रपटसृष्टीत जे सुरु आहे, ते पाहता तर लोकांची जीवनाबाबतची आसक्तीच नाहीशी होत चालली नसावी ना असा एक विचार मनात आपसूकच येऊन जातो. एका शायरने म्हटल्याप्रमाणे ‘मौत को तो मैने कभी देखा नही, पर यकिनन बहुत खुबसूरत होगी, जो भी मिलता है उससे, जीना छोड देता है.’ सध्या बॉलिवूडची स्थिती काहीशी अशीच आहे. कारण मनोरंजन सृष्टीतून दर दोन दिवसाआड कुणा ना कुणाच्या तरी मृत्यूची बातमी तर येतेच, त्यातही अर्ध्याहून अधिक या आत्महत्या असतात. या आत्महत्यांविषयी ऐकले की वाटते खरेच जीवन इतके स्वस्त झाले आहे का? 

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येतून बॉलिवूड सावरते ना सावरते तोच अभिनेते आसिफ बसरा यांच्या आत्महत्येचे वृत्त येऊन धडकले आहे. आसिफ यांनी १२ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. आसिफ या कलाकाराविषयी तसे क्वचितच सिनेरसिकांना माहित असावे. परंतु, एका चित्रपटात छोट्यातली छोटी भूमिकाही किती महत्त्वपूर्ण असते याची जाणीव ज्यांना आहे, त्यांच्यासाठी आसिफ बसरा हे नाव नवे नक्कीच नसावे. कारण आसिफ यांनी छोट्या पण, महत्त्वपूर्ण भूमिकांमधून स्वत:ची छाप सोडली आहे. आसिफचे कार्यक्षेत्र केवळ चित्रपटांसाठी मर्यादित नव्हते तर छोट्या पडद्यावरही त्यांनी ठसा उमटवला आहे. त्यात या कलाकाराला नाटकांची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांचा अभिनय काय तोडीचा असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नसावी. 

आसिफ बसरा यांचा जन्म २७ जुलै १९६७ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला होता. पन्नाशी ओलांडलेल्या आसिफ यांनी कारकिर्दीची सुरुवात ‘वो’ या टीव्ही मालिकेद्वारे केली होती. १९९८ मध्ये आलेल्या ‘द नेपश’ या हॉरर सिरिजमध्येही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हॉस्टेजस’ या वेबसिरिज मध्येही त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर ‘ब्लॅक फ्राइडे’, ‘परजानिया’, ‘काइ पो छे’, ‘जब वी मेट’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘एक व्हिलन’, ‘मंजूनाथ’सह ‘द ताशकंद फाइल्स’ सारख्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केलेल्या आसिफ यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले नसले तरी त्यांचा सहज सुंदर अभिनय पाहता त्यांना अशा कुठल्याही प्रशिक्षणाची गरजच नव्हती इतके मात्र निश्चित... रंगभूमी हेच त्यांचे प्रशिक्षण केंद्र ठरले असावे. कारण अगदी बालवयात ते रंगमंचावर उतरले होते. पदवीपश्चात संगणकीय ज्ञान घेऊन ज्यावेळी आसिफ मुंबईत दाखल झाले, त्यावेळी उदरनिर्वाहासाठी त्यांनी नोकरी स्वीकारली. मात्र, या कामातून मिळणारा पगार अर्धा अधिक तर नाटके पाहण्यातच जात असे. कारण त्यांना अभिनयाचे वेडच लागले होते. त्यामुळे अभिनयाचे सर्व बारकावे शिकण्यासाठी त्यांना नाटकासारखे विशाल व्यासपीठ प्राप्त झाले होते. या अनुभवाचा वापर त्यांनी आपल्या पुढील कारकिर्दीत केला व अभिनयासोबतच इतरांना अभिनय शिकवण्यातही ते तरबेज झाले. त्यामुळेच असावे की पृथ्वी थिएटरमध्ये अनेक युवा कलाकारांना त्यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे.

आसिफ बसरा एक अतिशय नम्र व्यक्तिमत्त्व होते. एक कलाकार आणि त्यातही एक सुपरिचित कलाकार असूनही त्यांनी कधीच ‘स्टारडम’ दाखवला नाही. किंबहुना स्वत:विषयी ते कधीच बोलत नसत. केवळ प्रसिद्धी माध्यमेच नव्हे तर त्यांचे जवळचेही क्वचितच त्यांच्याविषयी विशेष माहिती ठेवून होते. त्यांनी आपले वैयक्तिक व व्यावसायिक जीवन वेगवेगळे ठेवले होते. त्यामुळे त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटूंबाविषयी कुठलीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, सध्या तरी या केवळ अफवा ठरल्या आहेत, त्याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यांनी आत्महत्या केली तेव्हा ते हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाला गावात होते. गेली पाच वर्षे ते या ठिकाणी मॅक्लोडगंजमध्ये एका भाड्याच्या घरात रहात होते. त्यांची आत्महत्या अधिक चर्चेत आली आहे, कारण असे सांगितले जाते की या ठिकाणी ते एका पाश्चिमात्य महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. सदर भाड्याच्या घरात ते तिच्यासोबतच होते. दुपारी ते कुत्र्याला घेऊन फिरायले गेले व परतल्यानंतर त्यांनी त्या कुत्र्याच्याच पट्ट्याने गळफास लावून घेतला. ते डिप्रेशनच्या आहारी गेल्याचेही सांगितले जाते. नैराश्येच्या गर्तेत हरवलेल्या आसिफ यांनी सुशांतसह काम केले होते, त्यामुळे सध्या सोशल मिडियावर उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. काहींच्या मते ते ‘नेपोटिझम’चे शिकार झाले आहेत तर काहींच्या मते अमली पदार्थांच्या व्यवहाराशी ते निगडीत असावेत. काहींच्या मते त्यांना सेटवर चांगली वागणूक मिळत नव्हती तर काहींच्या मते त्यांच्या योग्यतेला साजेशा भूमिका त्यांना मिळत नव्हत्या म्हणून ते निराश झाले होते. त्यात त्यांच्या पाश्चिमात्य मैत्रिणीवरही आरोप प्रत्यारोप होत आहेत. आसिफ यांच्या मृत्यूचे खरे कारण जरी कळले नाही तरी एक मात्र नक्की की बॉलिवूडच्या झगमगाटात दडलेला काळोख उत्तमोत्तम कलाकारांना गिळंकृत करत आहे.

(लेखिका नामवंत सिनेसमीक्षक आहेत.)