कलाकार
जनरल सुनिथ फ्रान्सिस राॅड्रिग्स हे लष्कराचे प्रमुख होणारे पहिले गोमंतकीय. ते मूळ कुडतरीचे. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९३३ रोजी मुंबईत झाला. तेथील सेंट झेवियर्स विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. २८ डिसेंबर १९५२ रोजी त्यांनी सैन्यात प्रवेश केला. १९७२ साली पाकिस्तानविरुद्धच्या युद्धानंतर त्यांना विशिष्ट सेवापदक देण्यात आले. ब्रिगेडियर असताना त्यांनी १९७५ ते १९७७ पर्यंत डोंगराळ भागात काम करणाऱ्या पायदळाच्या गटाचे प्रमुख होते. नंतर १९७८ साली ते पुढचे लष्करविषयक शिक्षण घेण्यासाठी राॅयल काॅलेज आॅफ डिफेन्स स्टडिजमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला. मग १९७९ ते १९८१ पर्यंत त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ महाविद्यालयात अध्यापन केले. त्याच सुमारास त्यांना मेजर जनरल पदावर बढती मिळाली. १९८२ साली त्यांनी डिफेन्स स्टडिजमध्ये मास्टर्स पदवी मिळवली. नंतर ते जनरल मिलिटरी ट्रेनिंगचे संचालक होते.
सुनिथ राॅड्रिग्स नोव्हेंबर १९८७ ते एप्रिल १९८९ पर्यंत लष्कराचे उपप्रमुख होते. १९९० ते १९९३ पर्यंत ते प्रमुख होते. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक मिळाले आहे. ४१ वर्षांच्या सेवेनंतर ते ३० जून १९९३ रोजी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते गोवा इंटरनॅशनल सेंटरचे सहा वर्षे संचालक होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावरही ते होते. गोवा विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळावर त्यांनी सात वर्षे काम केले आहे. गोवा चेंबर आॅफ काॅमर्समध्येही ते होते.
२००४ साली त्यांना पंजाबचे राज्यपाल व चंडिगढचे प्रशासक म्हणून नेमण्यात आले. तेथे ते २०१० पर्यंत होते. नोकरीत असताना त्यांनी ‘आशा’ ही संस्था सुरू केली होती. सुरुवातीला आठ मुले होती. आज या संस्थेची ३४ केंद्रे आहेत, जी रस्त्यावरील मुलांना निवारा देतात.
मोकळ्या वेळेत ते फुटबॉल, हॉकी, टेनिस व बॉक्सिंग खेळतात. त्यांना संगीताची आवड आहे. वाद्य शिकलो नाही, याची खंत त्यांना आजही आहे. अनेक व्यक्तींशी त्यांची जवळून ओळख होती. त्यात ब्रिटीश पंतप्रधान जॉन मेजर, पंतप्रधान स्व. राजीव गांधी, भूतानचे राजा, कॉलीन पॉवेल, मदर तेरेसा, पंतप्रधान नरसिंह राव यांचा समावेश आहे. सध्या ते पर्वरी येथे राहतात.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)