हिंदुत्ववादी पक्षांनी विवेकानंदापासून दूर राहणेच योग्य

खडे बोल

Story: दीपक लाड |
22nd November 2020, 05:36 pm
हिंदुत्ववादी पक्षांनी विवेकानंदापासून दूर राहणेच योग्य

हल्ली पंतप्रधान मोदी यांनी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (जेएनयू) स्थापित केलेल्या स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी केलेल्या भाषणांत भारत देश या संकल्पनेच्या मुळाशी स्वामीजी होते, असे सांगितले. लगेच “स्वामीजींची मूल्ये आणि तत्वज्ञान येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल, त्यासाठी जेएनयूला विवेकानंदांचे नांव दिले जावे” अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी केली. नेहरूंबद्दल संघ, मोदी आणि मंडळी बाळगत असलेला द्वेष हे नावबदलाच्या मागणीच्या मुळाशी असलेले प्रमुख कारण हे देशातील सूज्ञ मंडळी समजू शकते. 

जेएनयूच्या प्रांगणात वावरणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या झुंडांच्या उरावर विवेकानंद पुतळ्याच्या रूपाने ‘हिंदूत्व’ बसवून त्यांना अद्दल घडवण्याची ती एक राजकीय खेळी असू शकते. ज्या शेतकरी, कामगार वर्गाला त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्याच्या मुलभूत तत्वांवर मार्क्स, माओ यांनी आंदोलने उभारली होती, त्याच वर्गाची पिळवणूक, पायमल्ली या विचाररसरणीचा पुरस्कार करणाऱ्या जगातल्या कम्युनिस्ट एकाधिकारशाहीत झाली. कालबाह्य आणि अप्रासंगिक झालेल्या अपयशी डाव्या विचारसरणीचे रवंथ करत या येथे लोळणाऱ्या, बारामाही उग्र आंदोलने करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी झुंडाकडे विवेकानंदांची तत्वे, आदर्श आणि समाजांतल्या शोषित, पीडीतांच्या बाबतीत त्यांना असलेली अनुकंपा समजण्याची कुवत नाही. स्वामींच्या पुतळ्याशी तिथल्या विद्यार्थ्यांचे देणे-घेणेही नसणार.  

हिंदू धर्म आणि राष्ट्रवाद मिसळून बनवलेली कॉकटेल हिंदू जनतेला पाजवून धर्मीय, पंथीय ध्रुवीकरणात त्यांना झिंगवत ठेवून सत्ता भोगायची, हा भाजपचा अजेंडा असतो. गुजरातेत निवडणुकांच्या काळांत विवेकानंदाचा पुतळा टेंपोवर बसवून भाजपने मिरवणूका काढल्या होत्या. स्वामी बंगालचे आराध्य दैवत असल्याने त्याचा फायदा तिथल्या येत्या विधानसभा निवडणुकांत घेण्याचा भाजपचा मनोदय असू शकतो. पण, स्वामी आणि भाजपच्या हिंदू धर्माकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात जमीन-अस्मानाचा फरक आहे. शिकागोतल्या सर्वधर्म परिषदेत जगासमोर स्वामींनी ज्या हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध केले त्या व्यापक, उदात्त, सर्वसमावेशक हिंदू धर्माची व्याख्या आपल्या भगव्या राजकारण्यांना अभिप्रेत असलेल्या राजकीय हिंदुत्वाच्या अगदी विपरीत आहे.  

“धर्म हा पुस्तक, पंथ, राष्ट्र यात नसून तो मानवाच्या हृद्यात कोरलेला असतो. आम्हा सर्वांकडून तो व्यक्त होत असतो. जर का व्देष करण्यात शक्ती असते तर त्याच्याहीपेक्षा कितीतरी पट शक्ती ही प्रेमात असते. प्रारंभी जरी विरोध झाला तरी सरतेशेवटी प्रत्येक धर्माच्या ध्वजावर लिहिले जाईल की एकमेकांची मदत करा, भांडू नका– एकीकरण करा, विध्वंस नको- शांतता आणि सुसंवाद असू द्या, दुफळी नको.” - इति स्वामी विवेकानंद : उवाच।। याच्या उलट ‘आम्ही विरूद्ध ते’  या दुफळीवरच तर भाजपने आपला सत्तेचा डोलारा उभा केलाय. दुफळीसाठी दंगे भडकवल्याने स्वामींना वर्ज्य असलेला विध्वंसही तसा अटळ आहे. आज भाजप पक्षश्रेष्ठींनी या दुफळी माजवणाऱ्या राजकारणाला व्यवस्थित खतपाणी घालणारा असा लेखक, विचारवंत, माध्यमे यांचा एक वर्ग तयार केलाय. सरकारच्या निती आणि निर्णयांना लोकशाही पद्धतीने विरोध करणाऱ्यांच्या विरूद्ध मात्र बेकायदेशीर कृत्य विरोधी कायदा (यूएपीए), देशद्रोह आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा यासारखे जाचक कायदे लावून त्यांना जामीन न देता तुरूंगात डांबले जात असल्याने स्वामीना देशांत अपेक्षित असलेला सुसंवाद तो कसा आढळेल?  

२७- १०- १८९४ रोजी स्वामीजींनी अलासिंघा पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रांत नमूद केले आहे - “एका विधवेच्या डोळ्यांतली आसवे न पुसू शकणाऱ्या किंवा एका पोरक्या पोराच्या तोंडी अन्नाचा घास न घालू शकणाऱ्या देवामध्ये किंवा धर्मांत माझा विश्वास नाही. मग त्या धर्मांत कितीही उच्च कोटीची तत्वे असली काय किंवा तत्वज्ञान विणलेले असूदे, मी त्याला धर्म मानायला तयार नाही. तुम्ही देव कुठे शोधताहात? दीन, दुर्बळ, दयनीय यांच्यात तुम्हाला देव दिसत नाही का? त्यांची पूजा का नाही करत?” हे स्वामींचे सवाल होते. त्यांची पूजा करायचे सोडा, लॉकडाउनच्या काळांत भूक तहानेने व्याकूळ, उन्हात पायपीट करत निघालेल्या कुटुंबांना पाणी आणि अन्नाचे दोन घास पुरवण्याची तसदी ना केंद्र सरकारने घेतली ना भाजपशासित राज्य सरकारांनी.

धर्म परिषदेच्या दहाव्या दिवशी स्वामींनी आपल्या भाषणांत पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशांतल्या दुष्काळी भागांतील भूकबळींवर जे भाष्य केले होते ते आजही प्रासंगिक ठरावे. ते म्हणाले होते- “भारतातील भयंकर दुष्काळामुळे अन्नाला वंचित झालेले लोक मृत्युमुखी पडत असताना तुम्हा ख्रिश्चनांच्या काळजाला पाझर कसा फुटत नाही? साऱ्य़ा देशांत तुम्ही चर्च बांधण्याकामी गुंतलेला असता. हिंदुस्थानांतील जनता कशासाठी टाहो फोडत असेल तर अन्नासाठी. ते अन्नासाठी आपल्यासमोर हात पसरत आहेत आणि तुम्ही त्यांना चर्च बांधकामातले दगड देत आहात.” 

स्वामीनीं ख्रिश्चन मिशनऱ्यांना केलेला हा प्रश्न सव्वाशे वर्षानंतर आपण आपल्या देशांतल्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि योगी म्हणवून घेणाऱ्या आदित्यनाथना वेगळ्याप्रकारे विचारू शकतो. “योगीजी, कोवीड महामारीमुळे लोकांचे धंदे बसल्याने, नोकऱ्या गेल्याने पैशाअभावी कुटुंबे उपाशीपोटी झोपत असताना तुमच्या काळजाला पाझर कसा फुटत नाही? सद्य परिस्थितीत जनतेला धर्माहून जास्त गरज त्यांचे जीव वाचवण्याची आहे. लोक पैशांसाठी हात पसरत असताना करोडो रूपयांचा चुराडा करत तुम्ही अयोध्येत शरयूकाठी पाच लाख एकावन्न हजार दिवे पेटवत, राम-सीतेच्या आगमनाचे तमाशे लावत बसला आहात.”  

महिलांच्या कल्याणाविषयीची स्वामीजींची कणवही तीव्र होती. महिलांचे व्यक्तिमहत्व आणि अंगभूत गौरव, प्रतिष्ठा त्यांना मिळवून देण्यासाठी ते कार्यरत होते. त्यांनी आपले संन्यासीबंधू रामकृष्णानंद याना एका पत्रांत लिहिले होते– “पक्षी केवळ एका पंखाच्या आधारे गगनात भरारी मारू शकत नाही त्याप्रमाणे महिलांची स्थिती सुधारल्याशिवाय जगाचे कल्याण होणे संभव नाही. ते साध्य करण्यासाठी मला स्त्रियांसाठीच असा एक मठ स्थापन करायचा आहे. या येथे गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी तयार व्हायला हव्यात. देशात महिलांना पायदळी तुडवले जातेय आणि जातियवादाची बंधने घालून दलितांना भरडले जातेय.” 

स्वतंत्र गणराज्य भारत देशात भारत माता की जय, असे ओरडत रस्त्यात नाचणाऱ्या तथाकथित देशभक्तांच्या जिभेला देशात महिला, मुलींवर अत्याचार होत असताना नेमका लकवा मारलेला दिसतो. हाथरसमध्ये लैंगिक अत्याचारानंतर मारून टाकलेल्या दलित युवतीचा मृतदेह अंतिम क्रिया करण्यासाठी दिला जावा, यासाठी पोलिसांकडे दया याचना करणाऱ्या मातेला पोलिसांनी झिडकारून कुमक वाढवून बळजबरीने पीडितेचा मृतदेह धार्मिक क्रिया न करता अक्षरशः जाळून टाकलेला समस्त देशाने टीव्हीवर लाइव्ह पाहिला. त्या पोलिसांचा म्होरक्या (गृहमंत्री) गोरखनाथांचा वारसा सांगत स्वतःला कानफटा योगी म्हणवून घेणारा भाजप सरकारचा मुख्यमंत्री अजय बिश्त उर्फ आदित्यनाथ होता. दलित कुटुंबातील महिलांवर अत्याचार होत असताना स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणवून घेणारा सवर्ण हिंदूचा शासक वर्ग कसा उदासिन असतो, किंबहुना अप्रत्यक्षपणे त्या हिंस्त्र कृत्यांत सामील असतो ते त्या प्रसंगी जगाने पाहिले. स्वामी हयात असते तर त्यांनी या योग्याला कठोरतम शब्दांत धिक्कारला असता. 

स्वामी धर्मांध हिंदू, अंधभक्त नव्हते तर ते सत्यशोधक होते. येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाने ते प्रभावित होते. 

स्वामींनी जरी जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व तिथे जमलेल्यांना तर्कशुद्ध पध्दतीने पटवून दिले असले तरी जगातील इतर धर्मांचा ते सम्मान करत असत. धर्मसभेत बोलण्यापूर्वी त्यांनी प्रभू येशूंची करूणा भाकत म्हटले होते की मी या येथे माता मेरीच्या पुत्रांच्यामध्ये उभा आहे. प्रभू येशू मला मदत करतील. भारतभर हिंडत असताना स्वामी श्रीमद्भगवतगीतेबरोबर थॉमस कॅम्पीस लिखित द ईमाटेशन ऑफ ख्रिस्त, ग्रंथ घेऊन हिंडायचे. 

इतर धर्मांना कमी लेखणाऱ्या, त्यांना वाळवी म्हणून संबोधणाऱ्या भाजप घोळक्यांत स्वामी विसंगत वाटावेत. जय श्रीराम म्हण नाही तर कानफटीत मारीन म्हणणाऱ्यांचा ‘हिंदू ब्रांड’ हा स्वामींचा हिंदूधर्म नव्हे. स्वामी विवेकानंद हा तेजवंत झंझावात. त्यांची तत्वे, आदर्श समजण्याची लायकी नसलेल्या राजकीय पक्षांनी विवेकानंदापासून दूर राहणेच उत्तम. 

(लेखक विविध विषयांचे व्यासंगी आहेत.)