दहशतीचा बाज बदलतोय....

कव्हर स्टोरी

Story: प्रा. अशोक ढगे पुणे |
22nd November 2020, 05:32 pm
दहशतीचा बाज बदलतोय....

जगातल्या दहशतवादी संघटनांच्या हल्ल्यांची पद्धत एकसारखी नाही. पाकिस्तानमधल्या बहुतांश संघटना गोळीबार, बाँबहल्ले करतात. तालिबान ही संघटनाही अशाच पद्धतीनं दहशतवादी हल्ले घडवते; परंतु इराक आणि सीरियामध्ये उदयाला आलेली इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयसिस) ही संघटना मात्र लपून छपून नव्हे तर उघडपणे हल्ला करते. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये घडलेल्या घटनांमुळे आयसिसने आपली कार्यपद्धती बदलली असल्याचं दिसत असलं तरी चाकूनं दहशतवादी हल्ले करण्याच्या घटना जगभरात दिसत आहेत. रशियात दहा वर्षांपूर्वी चाकूहल्ल्याची पहिली दहशतवादी घटना घडली. गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या दहशतवादी घटनांकडे पाहिलं तर आयसिससारख्या संघटनेकडे समोरासमोर युद्ध करणारे दहशतवादी असल्याचं दिसतं आहे. दहशतवादी संघटनांना आता आपलं सैन्य इतर देशांमध्ये पाठवण्याची गरज भासत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून या संघटना आपल्या विचारसरणीचा प्रसार करतात आणि त्या आधारे भावनिक व धार्मिक आवाहन करून लोकांची माथी भडकावण्याचे प्रयत्न करतात. माथी भडकलेली अशी स्थानिक युवक मंडळी मग कोणत्याही थराला जाऊन आपला जीव धोक्यात घालून दहशतवादी हल्ले करतात. विशेषत: इस्लामी राष्ट्रातले काही युवक युरोपमध्ये चाकूने दहशतवादी हल्ले करतात. हल्ला करुन ते एक तर पळून जातात किंवा स्थानिक पोलिसांकडून मारले जातात.

फ्रान्सने ओढवून घेतली नाराजी

अलिकडेच फ्रान्समधल्या नीस या शहरात चाकूहल्ल्याची घटना घडली. यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. यात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं शीर कापण्यात आलं. अशी क्रुरता फक्त आयसिससारखीच संघटना करू शकते. यासंदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही दहशतवादी घटना असल्याच्या वृत्ताला फ्रान्स सरकारनं दुजोरा दिला. पैगंबर मुहंमद यांचं व्यंगचित्र दाखवणाऱ्या फ्रान्सच्या एका शिक्षकाच्या हत्येनंतर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांनी अनेक मुस्लिम देशांची नाराजी ओढवून घेतली आहे. मॅक्रॉन यांनी आपल्या वक्तव्यात ‘कट्टरवादी इस्लाम’वर टीका केली होती आणि शिक्षकाची हत्या म्हणजे ‘इस्लामिक दहशतवादी हल्ला’ असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अनेक अरब देशांनी फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार सुरू केला. कुवेत, जॉर्डन आणि कतारमधल्या काही दुकानांमधून फ्रान्सची उत्पादनं हटवण्यात आली. लिबिया, सीरिया आणि गाझा पट्टीत फ्रान्सच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत. विशिष्ट समुदायाच्या भावनेचा विचार करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येऊ शकत नाही, असं म्हणत मॅक्रॉन यांनी स्वत:चा बचाव केला. यामुळे धर्मनिरपेक्ष फ्रान्समधली एकता कमी होते, असंही त्यांचं म्हणणं होतं. त्यातूनच वाद झाला.

युरोप भयचकित

याच सुमारास अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्येही अतिरेकी हल्ले झाले. अफगाणिस्तानमध्ये वीसजणांचा तर ऑस्ट्रियात सहाजणांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रियात हल्लेखोरांनी एका ज्यू धर्मस्थळाजवळ सहा ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला तर अफगाणिस्तानमध्ये एका शाळेला लक्ष्य करण्यात आलं. व्हिएन्नाच्या हल्ल्यातल्या दोन हल्लेखोरांच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांच्या कारवाईत एका हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात आलं. हा २० वर्षीय हल्लेखोर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आठ महिन्यांचा तुरुंगवास भोगून सुटला होता. आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियाकडे जात असताना त्याला पकडण्यात आलं होतं. ज्या दहशतवादाचा सामना भारत करत आहे, तोच दहशतवाद एके दिवशी अवघ्या जगाला विळख्यात घेईल, असा इशारा भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातल्या प्रतिनिधीने दिला होता. त्या वेळी युरोपने तुम्ही ज्याला दहशतवाद समजता, तो इतरांसाठी न्यायाचा लढाही असू शकतो, अशी बोळवण केली होती. कट्टरपंथीयांनी २५ वर्षांमध्ये युरोपीय देशांमध्ये स्लीपर सेल तयार केले. आपण ज्यांना एके काळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे योद्धे समजत होतो, तेच आता आपल्या नागरिकांची मुंडकी उडवत आहेत, हे वास्तव अवघा युरोप भयचकित नजरेने अनुभवत आहे. दहशतवादाचं भेसूर रूप आता त्यांच्या लक्षात येईल. भारत आणि उपखंडातल्या देशांना दहशतवादाच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्याची किंमत आता चुकवावी लागत आहे, असं या प्रतिनिधीनं म्हटलं होतं. आता त्याचाच अनुभव युरोप घेत आहे.

‘लोन वूल्फ’ हल्ला

काबुलमध्ये दहशतवाद्यांनी नुकताच मोठा हल्ला केला. काबुल विद्यापीठातल्या बुक फेअरमध्ये आलेल्या तीन दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. काबुलमध्ये तालिबान्यांचे परस्परविरोधी गट अशी कृत्यं करत असतात. विद्यापीठाच्या उत्तर दिशेकडून गेटवर स्फोट झाल्यानंतर गोळीबार सुरू झाला. अनेक विद्यार्थी आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसले. या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचं तालिबानने स्पष्ट केलं आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या सैन्य माघारीची प्रक्रिया आणि चर्चा सुरू असताना अशा घटना वाढल्या आहेत. दरम्यान, फ्रान्सच्या लष्करानं माली या आफ्रिकन देशातल्या अल कैदाच्या अतिरेक्यांवर हवाई हल्ला केला. यात ५० अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. हा हल्ला बुर्किना फासोच्या हद्दीजवळ झाला. फ्रान्सनं २९ ऑक्टोबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली.

स्पेनमधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या बार्सिलोनामध्ये इस्लामिक दहशतवादानं पुन्हा एकदा फणा काढला. बार्सिलोनातल्या पर्यटकांनी गजबजलेल्या लास रांब्लास इथे भरधाव वेगातल्या व्हॅनखाली चिरडून १३ लोक मारले गेले तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले. लास रांब्लास हल्ल्यातल्या गाडीचा चालक युनूस अबू याकूब हल्ल्यानंतर गर्दीचा फायदा घेत पळून गेला. २२ वर्षांचा युनूस मोरक्कोहून स्पेनमध्ये आला होता. त्याला पोलिसांनी चकमकीत ठार केलं. युरोपमध्ये लंडन, पॅरिस, ब्रुसेल्स, स्टॉकहोम आणि हॅम्बर्ग आदी शहरांमध्ये झालेल्या हल्ल्यांप्रमाणेच हा देखील असंघटित, एकलकोंड्या दहशतवाद्याचा (लोन वूल्फ) हल्ला असावा, हा प्राथमिक अंदाज काही तासांमध्येच खोटा ठरला आणि त्यामागे १२ दहशतवाद्यांची तुकडी असावी, असं स्पष्ट झालं. कॅटालोनियातल्या कँब्रिल्स भागात एक ऑडी (गाडी) लोकांना चिरडण्याच्या उद्देशानं गर्दीत वेगानं घुसण्याचा प्रयत्न करत असताना उलटून पडली. त्यातल्या पाच तरुणांनी गाडीतून उतरून लोकांना चाकूनं भोसकायचा प्रयत्न केला असता पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सर्वजण ठार झाले. दहशतवाद्याने भोसकलेल्या एका ६३ वर्षीय महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

कॅटालोनियाच्या दक्षिणेला असलेल्या अल्कानार या शहरातल्या एका घरात झालेल्या स्फोटात एक मोरक्कन वंशाचा माणूस जखमी झाला होता. सुरुवातीला गॅसच्या गळतीमुळे हा अपघात झाला असावा, असं पोलिसांना वाटलं होतं; पण अधिक तपास केला असता अपघातस्थळी ब्रुटेन आणि प्रोपेन हे विषारी वायू भरून ठेवलेले १२० गॅस सिलेंडर मिळाले. ही योजना यशस्वी झाली असती, तर मोठ्या प्रमाणावर जीवित तसंच वित्तहानी झाली असती. लंडनमध्येही गर्दीचं ठिकाण आणि वेळ पाहून ट्रक गर्दीत घुसवण्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. तसंच तिथेही चाकू हल्ला झाला होता. वायव्य चीनमधल्या कुनीमंगमधल्या रेल्वे स्टेशनवर एका गटानं केलेल्या चाकू हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. हा अत्यंत सुनियोजित पद्धतीनं केलेला हिंसक आणि दहशतवादी हल्ला होता. चीनमध्ये सामूहिक चाकू हल्ला ही सामान्य बाब आहे; मात्र इतक्या मोठ्या पद्धतीनं अशा प्रकारचा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सर्व घटना आणि त्यामागील मानसिकता पाहता दहशतवादी आता समोरून हल्ला करण्याच्या मानसिकतेत पोहचले असून हल्ल्यानंतर एक तर ते पळून जातात किंवा स्थानिक पोलिसांकडून मारले जातात, असं दिसतं. दहशतीचं हे ताजं अस्त्र सामान्यांना विचारात पाडणारं आहे.

(लेखक परराष्ट्र व्यवहारविषयक जाणकार आहेत.)