२०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून युवा चेहऱ्यांना संधी

गिरीश चोडणकर : लोकांना नको असलेल्या प्रकल्पांना विरोध

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd November 2020, 12:35 am
२०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून युवा चेहऱ्यांना संधी

मडगाव : काँग्रेस पक्षाने नवी चळवळ सुरू केली आहे. आता २०२२ च्या निवडणुकांवेळी युवकांना काँग्रेस पक्ष संधी देणार आहे. आगामी निवडणुकांवेळी २५ ते ३० जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे व युवा उमेदवारांना पुढे आणण्याचे ठरवण्यात आले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर सांगितले. तसेच जनतेच्या विरोधात प्रकल्प लादण्याचा प्रकार झाल्यास लोकांसोबत रस्त्यावर उतरणार असल्याचेही स्पष्ट केले.
मडगावातील एका कार्यक्रमावेळी चोडणकर बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या निवडणुकीत काँग्रेसला लोकांनी कौल दिलेला होता. पैसा, शक्ती व दादागिरीच्या बळावर भाजपने काँग्रेसचे सरकार येऊ दिले नाही. आता लोकांवर विविध प्रकल्प लादून त्यांना रस्त्यावर येण्यास भाग पाडले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात की, दिल्लीपेक्षा गोव्यात प्रदूषण कमी असल्याने दिल्लीतून लोक गोव्यात येत आहेत. त्यांनी लक्षात ठेवावे की, गोवा प्रदूषणमुक्त राखण्यासाठी गोमंतकीय जनतेने प्रयत्न केले असून भाजपने यात काहीही केलेले नाही. गोव्याच्या जागृत लोकांनी राखून ठेवलेला हा गोवा भाजपला अंबानी, अदानी व जिंदाल अशा उद्योगपतींना विकू देणार नाही, असा इशारा गिरीश चोडणकर यांनी यावेळी दिला.
राज्यात भाजपनेच ए, बी, सी अशा टीम तयार केल्या आहेत. दिल्लीवरून आलेला आम आदमी पक्ष ही भाजपचीच ‘बी’ टीम असून काँग्रेसची मते कमी करण्यासाठी भाजप तिचा वापर करत आहेत. निवडणुकांपुरता असलेला विरोध निकालानंतर सहकार्यात बदलतो, असा दावाही चोडणकर यांनी सांगितले. आपमुळे गेल्या निवडणुकांत काँग्रेसचे चार उमेदवार हरले. भाजपला गरज असेल त्याठिकाणीच आप काँग्रेसची मते फोडण्यासाठी उमेदवार उभे करतात. भाजप सत्तेसाठी कोट्यवधी पैसा खर्च करण्यास तयार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता सजग राहिले पाहिजे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहनही चोडणकर यांनी केले.    

हेही वाचा