थिएमने नदालला नमवले

एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा


18th November 2020, 11:28 pm
थिएमने नदालला नमवले

फोटो : थि

लंडन : एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत मंगळवारी धक्कादायक निकालाची नोंद झाली. ऑस्ट्रियाच्या तिसर्‍या मानांकित डॉमिनिक थिमने गटवार साखळीत दुसर्‍या मानांकित स्पेनच्या राफेल नदालवर ७-६, ७-६ असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला.

विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम विजेता नदाल कारकीर्दीत एकदाही प्रतिष्ठित एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकू शकलेला नाही. थिमने यावर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नदालवर विजय मिळवला होता. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती थिमने येथे केली. दोन्ही सेट टायब्रेकरवर रंगले. मात्र थिम सरस ठरला. थिमने गटवार साखळीतील पहिल्या लढतीतही स्टेफानोस त्सित्सिपासला नमवले होते. याउलट नदालने सलामीला आंद्रे रुब्लेववर मात केली होती.

जोकोव्हिच-मेदवेदेव आमनेसामने

सर्बियाचा अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच आणि रशियाचा डॅनियल मेदवेदेव यांनी एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत त्यांच्या गटात विजयांची नोंद केली. आता जोकोव्हिच आणि मेदवेदेव बुधवारी गटवार साखळीतील लढतीत आमनेसामने येणार आहेत. मेदवेदेवने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला. मेदवेदेवचा या स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. अन्य लढतीत जोकोव्हिचने अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनचा ६-३, ६-२ असा सहज पराभव केला. श्वार्ट्झमनविरुद्ध आतापर्यंत खेळण्यात आलेल्या सर्व म्हणजे सहा लढतींमध्ये जोकोव्हिचने विजयाची नोंद केली आहे. जोकोव्हिचने या स्पर्धेत २००७ पासून सलामीची लढत गमावलेली नाही. त्यातच यंदा त्याला विक्रमी सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. याउलट श्वार्ट्झमन प्रथमच या स्पर्धेसाठी पात्र ठरला.

जोकोव्हिच आणि मेदवेदेव यांच्यात बुधवारी होणार्‍या लढतीतून गटातील विजेता ठरणार आहे. उभय खेळाडू सहा वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात जोकोव्हिचने चार, तर मेदवेदेवने दोन विजय मिळवले आहेत.