हैदराबाद-दिल्ली आज दुसरा क्वॉलिफाय सामना

विजेत्या संघाचा १० रोजी मुंबई इंडियन्सशी अंतिम सामना


07th November 2020, 09:39 pm

अबू धाबी : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये योग्य वेळी लय प्राप्त करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा रविवारी स्पर्धेतील दुसऱ्या पात्रता गटात (क्वॉलिफायर) दिल्ली कॅपिटलसविरुद्ध अबूधाबी येथील मैदानावर सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ १० रोजी मुंबई इंडियन्सशी आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी अखेरचे चारही सामने ‘करा किंवा मरा’ अशाच स्थितीतील होते. परंतु, हैदराबादने या सर्व सामन्यांत विजय मिळविला. तर सुरुवातीच्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटलने स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात चाहत्यांची निराशा केली असून या सामन्यांत त्यांना सर्वोच्च खेळी करावी लागणार आहे.
सुरुवातीच्या काही सामन्यांत खराब कामगिरी केल्यानंतर पुन्हा चांगले प्रदर्शन करणाऱ्या हैदराबाद संघाचे सारे श्रेय कर्णधार डेव्हिड वॉर्नरला जाते. त्याने आपल्या संघातील खेळाडूंचा उत्कृष्ट वापर केला. दुसरीकडे सुरुवातीच्या नऊ सामन्यांमध्ये सात विजय नोंदविणाऱ्या दिल्ली कॅपिटलच्या गेल्या सहा सामन्यांत झालेल्या पाच पराभवांमुळे कर्णधार श्रेयसच्या योजनेला मात्र धक्का बसला आहे. युवा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलच्या १३व्या मोसमात पहिल्यांदाच संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर वॉर्नर २०१६मध्ये मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती करून संघाला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनविण्यासाठी आतूर आहे. वॉर्नरने जर पुढील दोन्ही सामने जिंकल्यास स्पर्धेतील सर्वात कमी अनुभव असलेल्या खेळाडूंसह ही स्पर्धा जिंकल्याचा मान त्याला मिळणार आहे.
दिल्ली संघासाठी सर्वात मोठी चिंता ही त्यांच्या वरच्या फळीतील अवसानघातकी फलंदाजी आहे. सलामीवीर शिखर धवनने (१५ सामन्यांत ५२५) एकूण कामगिरी बजावली असली तरी शेवटच्या काही सामन्यात तो मोठा डाव खेळू शकला नाही. तर युवा पृथ्वी शॉ (१३ सामन्यांत २२८) वेगवान गोलंदाजांविरुद्ध असफल ठरला आहे. अनुभवी अजिंक्य रहाणे (७ सामन्यांत १११)ने आतापर्यंत केवळ एका सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. मागील मुंबई विरुद्धच्या सामन्यात खाते न उघडताच सलामीवीर बाद झाल्याने दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग नाराज आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत नऊ वेळा असा प्रसंग घडला आहे. ज्यामध्ये धवन चार वेळा, पृथ्वी तीन, तर रहाणे दोनवेळा शुन्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
मुंबई इंडियन्सविरुद्धचा पहिला क्वॉलिफायर सामना सोडल्यास दिल्लीचे गोलंदाज कागिसो रबाडा (२५ विकेट), एन्रिक नॉर्टजे (२०) आणि रविचंद्रन अश्विन (१३) यांनी बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सनरायझर्सच्या फलंदाजांनी गेल्या काही सामन्यांमध्ये वेग पकडला असून संघातील अष्टपैलू जेसन होल्डरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गोलंदाजीत सनरायझर्सकडे संदीप शर्मा, होल्डर, शाहबाज नदीम, टी नटराजन आणि राशिद खानसारखे इन-फॉर्मर गोलंदाज आहेत. संदीपने पॉवरप्लेमध्ये, तर डेथ ओव्हर्समध्ये नटराजनने चांगली कामगिरी केली आहे. मधल्या षटकांत राशिद बऱ्यापैकी किफायतशीर ठरला आहे. हैदराबादचा एकमेव दुर्बल घटक म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज प्रियम गर्ग आणि अब्दुल समद. या युवा खेळाडूंना आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठे आव्हान पार करावे लागणार आहे.

डेथ ओव्हर्समधील कामगिरी निराशाजनक : पॉन्टिंग
पहिल्या क्वालिफायर लढतीत डेथ ओव्हर्समधील आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीवर निराशा व्यक्त करताना दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी फायनलमध्ये धडक मारण्यासाठी संघाकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यानंतर पॉन्टिंग म्हणाले,‌ अखेरच्या पाच षटकांत आमची कामगिरी निराशाजनक झाली. आम्ही हार्दिक पांड्याला त्याच्या मनाप्रमाणे गोलंदाजी केली. ईशान किशननेही यंदाच्या मोसमात आमच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. आम्ही स्पर्धेत योजनाबद्ध खेळ केला, पण या लढतीत दडपणाखाली आम्हाला रणनीतीनुसार खेळ करता आला नाही. त्यामुळे रविवारच्या सामन्यात आम्हाला सांघिक रूपाने सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

केएल राहुलची ऑरेंज कॅप धोक्यात
आयपीएलच्या पहिल्या आठवड्यापासून ऑरेंज कॅपवर किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने कब्जा केला आहे. राहुलने या हंगामात १४ सामन्यांत १ शतक आणि ५ अर्धशतके लगावत ६७० धावा केल्या आहेत. मात्र, आता हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन हे दोन फलंदाज राहुलचा रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ आहेत. वॉर्नरने आतापर्यंत ५४६ धावा केल्या आहेत. राहुल आणि वॉर्नर यांच्यात १२४ धावांचे अंतर आहे. वॉर्नरचा संघ रविवारी दुसरा क्वालिफायर सामना खेळणार आहे. त्याचबरोबर दिल्लीचा सलामी फलंदाज शिखर धवनही या शर्यतीत आहे. धवनने १५ सामन्यांत ५२५ धावा केल्या आहेत. राहुलला मागे टाकण्यासाठी धवनला १४५ धावांची गरज आहे. त्यामुळे रविवारच्या सामन्यात या दोघांनाही ऑरेंज कॅप मिळवण्याची संधी आहे.