‍राफेल नदाल उपांत्यपूर्व फेरीत धडक

पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा


07th November 2020, 09:35 pm

पॅरिस : वीस वेळचा ग्रॅण्ड स्लॅम विजेता राफेल नदालने पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. नदालने ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनवर ६-१, ७-६ (७-३) असा विजय नोंदविला.

जागतिक क्रमवारीत ६१व्या क्रमांकावर असलेल्या थॉम्पसनने नदालला विचार करण्यास भरपूर संधी दिली. परंतु, नदाल सेट पॉइंटला मुकला. मात्र, सरतेशेवटी त्याने बाजी मारली. नदालने कधीही पॅरिस मास्टर्सचे विजेतेपद जिंकले नाही. तेरा वर्षांपूर्वी त्याने अंतिम फेरी गाठली होती. परंतु, त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता उपांत्य फेरीसाठी नदालची गाठ त्याचा स्पेनचा मित्र पाब्लो कॅरीनो बुस्टाशी पडणार आहे. 

नदालने गाठला हजार विजयांचा टप्पा 

अव्वल सिडेड नदालने या स्पर्धेत फेलिसियानो लोपेझवर मात करून व्यावसायिक टेनिस स्पर्धेत एक हजार विजयांचा टप्पा पार केला. पॅरिस मास्टर्समध्ये हा टप्पा गाठत अशी कामगिरी करणारा नदाल चौथा टेनिसपटू ठरला आहे. त्याने फेलिसियानो लोपेझचा ४-६, ७-६ (७-५), ६-४ असा पराभव केला होता. 

अलेक्झांडरची आगेकूच
सुमारे तीन तास चाललेल्या दुसऱ्या एका लढतीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने फ्रान्सच्या आद्रियन मॅन्नेेरिनोवर ७-६ (११), ६-७ (७), ६-४ असा विजय नोंदविला. आता अलेक्झांडरची पुढील लढत तीनवेळचा ग्रॅण्ड स्लॅम विजेता स्टॅन वावरिंकाशी होणार आहे. स्वीत्झर्लंडच्या अनुभवी वावरिंकाने पाचवा सीड रशियाच्या आंद्रे रूब्लेव्हची चिवट झुंज १-६, ६-४, ६-३ अशी मोडून काढली. डॅनियल मेदवेदेवने १६वा सीड अ‍ॅलेक्स डी मिनॉरवर ५-७, ६-२, ६-२ अशी मात केली. रशियाच्या डॅनियलचा पुढील सामना सहावा सीड दिएगो श्वार्ट्झमनशी होणार आहे. दिएगोने पात्रताधारी अलेजांड्रो फोकिनावर ६-१, ६-१ अशी मात केली.