आयपीएल : दिल्ली, बंगळुरू प्लेऑफमध्ये


02nd November 2020, 11:39 pm
आयपीएल : दिल्ली, बंगळुरू प्लेऑफमध्ये

अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या ५५व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. बंगळुरूचे १५३ धावांचे लक्ष्य दिल्लीने ६ चेंडू व ६ गडी बाकी ठेऊन गाठले.
दिल्लीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. तसेच चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर बंगळुरूच्या संघालाही प्ले-ऑफ्सचे तिकीट मिळाले.
१५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. दिल्लीचा धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ (९) स्वस्तात बाद झाला. त्याला महम्मद सिराजने एकूण १९ धावांवर त्रिफळाचित केले.
धवन-रहाणेत अर्धशतकी भागिदारी
शॉ स्वस्तात बाद झाल्यानंतर धवनने अजिंक्य रहाणेच्या सोबतीने दिल्लीचा डाव वेगाने पुढे नेला. दोघांनी शानदार फलंदाजी केली व बंगळुरूच्या गोलंदाजांना लहान लक्ष्याचा बचाव करणे कठीण करून ठेवले. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ८८ धावांची भागिदारी केली. ही भागिदारी तोडण्यात शाहबाज अहमदला यश आले. अहमदच्या गोलंदाजीत धवन शिवम दुबेच्या हाती झेल देऊन बाद झाला. धवनने या डावात ४१ चेंडूत ६ चौकार लगावत ५४ धावा केल्या.
श्रेयस अय्यर स्वस्तात बाद
शिखर धवनच्या स्थानावर आलेला कर्णधार श्रेयस अय्यर आपल्या संघाला अखेरपर्यंत घेऊन जाऊ शकला नाही. अय्यरला वैयक्तिक ७ धावांवर शाहबाज अहमदने बाद केले. दरम्यान अजिंक्य रहाणेने आपले अर्धशतकही पूर्ण केले, मात्र अय्यर बाद झाल्यामुळे पुन्हा एकदा दबाव दिल्लीवर आला. दिल्लीने आपला तिसरा गडी एकूण १३० धावांवर गमावला.
अर्धशतक लगावून रहाणे बाद
दिल्लीला विजयासाठी १७ चेंडूत १७ धावांची गरज असताना अजिंक्य रहाणे वैयक्तिक ६० धावा करून बाद झाला. रहाणे बाद झाल्यामुळे दिल्लीला मोठा धक्का बसला. रहाणेला वॉशिंगटन सुंदरने बाद केले. त्याने आपल्या खेळीत ४६ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार व एक षटकार लगावत ६० धावा केल्या.
मार्कस-पंतने ओलांडला विजयाचा उंबरठा
रहाणे बाद झाल्यानंतर ऋषभ पंत व मार्कस स्टोईनिस यांनी सूत्रे हातात घेतली. दोघांनी चांगली फलंदाजी करताना आवश्यक असलेल्या १७ धावा अखेरचे चेंडू शिल्लक ठेवून गाठले. पंत ४ तर मार्कस स्टोईनिस १० धावा करून नाबाद राहिला. बंगळुरूतर्फे शाहबाज अहमदने सर्वा​धिक २ तर महम्मद सिराज व वॉशिंगटन सुंदर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२०) च्या ५५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १५२ धावा केल्या. देवदत्त पडीकलने शानदार अर्धशतक झळकावले.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघात शिमरन हेटमायेर, हर्षल पटेल आणि प्रवीण दुबे यांच्या जागी अजिंक्य रहाणे, डॅनियल सायम्स आणि अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला होता. आरसीबीच्या संघात शिवम दुबे आणि शाहबाज अहमद यांना गुरकीरतसिंग मान आणि नवदीप सैनी यांचा स्थानावर खेळवण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने चांगली सुरुवात केली आणि ५ व्या षटकातच संघाने सलामीवीर जॉश फिलीपची विकेट गमावली. फिलीप १२ धावा करून कागिसो रबाडाच्या गोलंदाजीत बाद झाला. दरम्यान देवदत्त पडीकलने आपला फॉर्म कायम ठेवला आणि कर्णधार विराट कोहलीबरोबर ८ व्या षटकात संघाला ५० धावांची मजल मारुन दिली.
पुन्हा एकदा आरसीबीची टीम मधल्या षटकांत वेगवान खेळण्यात अपयशी ठरली आणि १० षटकांनंतर त्यांची धावसंख्या १ बाद ६० अशी होती. विराट कोहली वैयक्तिक १३ धावांवर असताना एर्निक नोर्त्झेने त्याचा झेल सोडला, मात्र या जीवदानाची संधी विराटला घेता आली नाही. १३ व्या षटकात अश्विनने एकूण ८२ धावांवर कोहलीला (२४ चेंडूत २९ धावा, दोन चौकार आणि एक षटकार) बाद करून दिल्लीला दुसरे यश मिळवून दिले. पडीकलने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आणि ४०व्या चेंडूवर दोन धावा घेऊन या मोसमातील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर देवदत्त (४१ चेंडूत 5 चौकारांसह ५० धावा) फार काळ टिकू शकला नाही आणि पुढच्या षटकात नोर्त्झेने एकूण ११२ धावांवर त्याला बाद केले. याच ओव्हरमध्ये नोर्त्झेने ख्रिस मॉरिसला ० धावांवरही बाद केले.
शेवटी एबी डिव्हिलियर्स आणि शिवम दुबे यांनी मोठे शॉट्स खेळण्यास सुरूवात केली आणि धावांचा वेग वाढविला. डावाच्या १९ व्या षटकात एबी डिव्हिलियर्सने षटकार ठोकला, तर शिवम दुबेनेही चौकार ठोकला आणि स्कोअर १५० च्या जवळ नेला. परंतु, रबाडाने दुबेला (११ चेंडूंत १७ धावा) बाद केले.
अखेरच्या षटकात डिव्हिलियर्स दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. पहिल्या चेंडूवर उदानाने चौकार लगावत १५० धावांचा टप्पा आपल्या संघाला गाठून दिला, पण पुढच्याच चेंडूवर तोही बाद झाला. आरसीबीने २० षटकांत ७ गडी गमावून १५२ धावा केल्या. दिल्ली कॅपिटलतर्फे नोर्त्झेने सर्वाधिक ३, कागिसो रबाडाने २ आणि रविचंद्रन अश्विनला एक विकेट मिळवली.
पडीकल आणि एबी डिव्हिलियर्स मैदानात एकत्र आले. पडीकलने डॅनियल सॅमच्या षटकात चौकार आणि दोन धावा घेऊन अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४० चेंडूत ५० धावांचा टप्पा ओलांडला. या मोसमात हे त्याचे पाचवे अर्धशतक होते. तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळत आहेत. पदार्पण हंगामात कोणत्याही अनकॅप्ड खेळाडूने सर्वाधिक धावा केल्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला आहे. पूर्वी हा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता.