तुर्कीत भूकंपाने हाहाकार

- इमारती कोसळल्या : ६ बळी, शेकडो नागरिक जखमी

Story: अंकारा : |
31st October 2020, 12:19 am
तुर्कीत भूकंपाने हाहाकार

अंकारा : तुर्कीमधील इजमिरमध्ये शुक्रवारी मोठा भूकंप झाला. त्यात अनेक इमारती कोसळल्याची माहिती असून, शेकडोजण इमारतीच्या ढिगार्‍यात अडकले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

 तुर्कीचे मंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, या भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.  भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचे केंद्र ग्रीसमधील कार्लोवसियन शहराच्या उत्तर-पूर्व भागात १४ किमी दूर अंतरावर होते. जमिनीपासून कमी खोलवर भागात भूकंपाचे केंद्र असल्यामुळे तीव्र झटका बसला. दरम्यान, सोशल मीडियावर तुर्कीच्या पश्चिम शहरात भूकंपानंतर सुनामीची लाट आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओतील सत्यतेची पुष्टी अद्याप करण्यात आली नाही. 

ग्रीसमध्ये घबराट 

भूकंपाच्या धक्क्यानंतर सामोसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. काही घरांच्या आणि इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती उपमहापौरांनी दिली आहे. ग्रीस आणि तुर्की हे दोन्ही देश भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. खबरदारी म्हणून विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली.