म्हापसा अर्बनच्या ठेवीदारांची रक्कम त्वरित परत करा

निवेदनाद्वारे ठेवीदार संघटनेची लिक्वीडेटरकडे मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October 2020, 11:56 pm

म्हापसा : गेली सहा वर्षे म्हापसा अर्बन बँकेत ठेवी अडकून पडल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे आतोनात हाल होत असून पाच लाख रुपये पर्यंतच्या ठेवी त्वरित परत करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी ठेवीदारांच्या संघटनेने बँकेच्या लिक्वीडेटर दौलत हवालदार यांच्याकडे निवेदन सादर करून केली आहे.
म्हापसा अर्बन बँक दिवाळखोरीत काढून सहा महिने उलटले आहेत. ठेवीदारांनी आपल्या ठेवीचे दावे सादर करून दोन महिने उलटले आहेत. पण, अद्याप एकही दावा विमा महामंडळाकडे पोचलेला नाही. लोकांच्या ठेवी गेले सहा वर्षे अडकून पडल्या असून या ठेवीच्या व्याजावर जीवन जगणार्‍या लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे अजून वेळ न काढता या लोकांना पाच लाखपर्यंतच्या ठेवी परफेड करण्याची तसदी घ्यावी, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी परत करण्यासाठी बँकेच्या मालमत्तेची लिलाव प्रक्रियाही त्वरित सुरू करावी, अशी विनंती संघटनेतर्फे जोजफ कोर्नेरो, प्रभाकर साळगावकर, अरुण खंवटे व डॉ. कुंदा केणी यांनी केली आहे.
दरम्यान, बँक दिवाळखोरीत जाण्यास जबाबदार असलेल्या माजी संचालक मंडळाविरुद्ध कारवाईसाठी लिक्वीडेटर हवालदार यांनी पोलिस तसेच इतर प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करावी, अशी मागणीही संघटनेने निवेदनातून केली आहे.