जाहीर कार्यक्रमात गडकरी अधिकार्‍यांवर संतापले

- राजमार्ग प्राधिकरणाच्या कामात दिरंगाई

Story: नवी दिल्ली : |
29th October 2020, 12:33 am
जाहीर कार्यक्रमात गडकरी अधिकार्‍यांवर संतापले

नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी बुधवारी झालेल्या एका व्हर्च्युअल कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कामात झालेल्या ढिलाईमुळे अधिकारी वर्गावर चांगलेच संतापले. गडकरी यांनी एनएचएआय भवन उद्घाटनाच्या ऑनलाइन कार्यक्रमात प्राधिकरणार्‍या अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. २५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प सन २००८ मध्ये निश्चित झाला होता. या प्रकल्पाचे टेंडर २०११ मध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर ९ वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला, अशी माहिती गडकरी यांनी या कार्यक्रमात दिली.

 गडकरी यांनी यांनी नाराजी जाहीर करत म्हटले की, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन सरकारे आणि ८ चेअरमन लागले. विद्यमान चेअरमन आणि सदस्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. मात्र ज्या महान व्यक्तिमत्वांनी हे काम करण्यासाठी २०११ ते २०२० हा ९ वर्षांचा कालावधी लावला त्याचे फोटो नक्कीच या कार्यालयात लावा. याच लोकांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यास ९ वर्षे लावली हे कळावे, असे गडकरी म्हणाले. गडकरी म्हणाले की, आपण अभिमानाने सांगत असतो की ८० हजार ते १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार आहोत. मग जर एवढ्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणार्‍या या मोठ्या कामाला फक्त तीन साडेतीन वर्ष लागणार असतील, तर या दोनशे कोटींच्या कामासाठी आपण दहा वर्ष घालवली. हे अभिनंदन करण्यासारखे आहे का? असे म्हणत मला हे सांगायची लाज वाटत असल्याचे गडकरी म्हणाले.