बिहारात सरासरी ५३ टक्के मतदान

- पहिला टप्पा; नागरिकांनी पाळल्या सुरक्षा सूचना : निवडणूक आयुक्त

Story: नवी दिल्ली ः |
29th October 2020, 12:29 am
बिहारात सरासरी ५३ टक्के मतदान

नवी दिल्ली ः बहुचर्चित बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी ७१ जागांसाठी मतदान झाले. काही ठिकाणी सुरवातीला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये समस्या आल्या. पण, नंतर पुन्हा मतदानाला वेग आला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दिवसभरात ५३.५४ टक्के मतदान झाले. 

 सायंकाळी उशिरा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी सांगण्यात आले की, सध्याची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आम्हाला सुरक्षित निवडणुका घ्यायच्या आहेत. बिहारच्या नागरिकांनी सर्व सूचना पाळल्या आणि मतदान केले, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले. यापूर्वी २०१५ मध्ये ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. 

राहुलविरोधात तक्रार 

दरम्यान, बिहार भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निवडणुकीच्या आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. याची तक्रारही भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत बिहारच्या लोकांना महागठबंधनला मते देण्याचे आवाहन केले होते. 

गया येथे २७ उमेदवार 

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील ७१ विधानसभेच्या जागांमध्ये चैनपूर हा सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. मतदारांचा विचार करता सर्वात मोठा मतदारसंघ हिलसा हा आहे. तर, सर्वात छोटा मतदारसंघ बरबीघा हा आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत येणार्‍या गया टाऊन विधासभा मतदारसंघात सर्वांत जास्त (२७) उमेदवार उभे आहेत, तर कटोरिया मतदारसंघात सर्वात कमी (५) उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

लक्षवेधी ठरणार लढत  

पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवारांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी श्रेयसी सिंह जमुई मतदारसंघात उभ्या आहेत. त्यांचा मुकाबला राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार विजय प्रकाश यांच्याशी आहे. विजय प्रकाश हे केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय असलेले जयप्रकाश नारायण यादव यांचे भाऊ आहेत. जमुई लोकसभा मतदारसंघाचे खासदार लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान हे आहेत. तर, जयप्रकाश नारायण यादव यांच्या कन्या दिव्या प्रकाश तारापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

............................

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत राज्य मंत्रिमंडळातील सहा सदस्य आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये गया शहरातून प्रेम कुमार, लखीसराय येथून विजयकुमार सिन्हा, बाका येथून रामनारायण मंडल, जहानाबाद येथून कृष्णनंदन प्रसाद वर्मा, दिनारा येथून जयकुमार सिंह, राजपूर येथून संतोष कुमार निराला यांचा समावेश आहे. सार्‍यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.