राज्यातील कॅसिनो रविवारपासून सुरू

मंत्रिमंडळाचा निर्णय; पर्यटकांसह महसूल वाढीचाही विश्वास


28th October 2020, 10:38 pm
राज्यातील कॅसिनो रविवारपासून सुरू

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत वीजमंत्री नीलेश काब्राल.

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : करोनामुळे मार्चपासून बंद असलेले कॅसिनो १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील कॅसिनो १ नोव्हेंबरपासून सुरू होतील. त्यासाठी गृह खात्याकडून नियमावली जारी केली जाईल. गेल्या सहा महिन्यांची आगाऊ फी त्यांच्याकडून भरून घेतली जाईल आणि ५० टक्के क्षमतेने कॅसिनो सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील कॅसिनो १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने पणजीसह आसपासच्या परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांत आनंद पसरला आहे. देशभरातील पर्यटकांना कॅसिनोंचे आकर्षण असते. अनेक पर्यटक कॅसिनोंसाठीच गोव्यात येत असतात. त्यातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. शिवाय कॅसिनोंवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनाही फायदा मिळतो. गेल्या काही महिन्यांत इतर सुविधा सुरू होत होत्या. पण कॅसिनो सुरू करण्यास सरकार मान्यता देत नव्हते. त्यामुळे पर्यटक गोव्यात येत नसल्याचा दावा करत कॅसिनो लवकरात लवकर सुरू करण्याची मागणीही स्थानिक व्यापार्‍यांकडून होत होती. अखेर सरकारने कॅसिनो सुरू करण्यास हिरवा कंदिल दाखवल्याने पर्यटकांचा ओढा वाढेल. त्यातून सरकारी तिजोरीत महसूल आणि करोनामुळे उद्धवस्त झालेले विविध उद्योगधंदेही पूर्वपदावर येतील, असा विश्वास राजधानी पणजीतील अनेक व्यापार्‍यांकडून व्यक्त होत आहे.

मंत्रिमंडळाचे इतर निर्णय

- सरकारी खात्यांत जीबीबीएम कनेक्टिव्हिटी दिलेल्या कंत्राटदारास सहा महिन्यांची मुदतवाढ

- गोमेकॉतील ऑन्कोलॉजी विभागातील सल्लागार डॉ. अनुपमा बोरकर यांना वर्षाची मुदतवाढ

- करोना काळातील एन-९५ मास्कच्या खरेदीस मान्यता

- जैवविविधता मंडळाने तयार केलेल्या वातावरण बदल कृती आराखड्यात सुधारणा करून त्याला मान्यता देण्यास मंजुरी

- केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत राज्यात मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता

‘एक्सवायकेनो’ची एमडीओ म्हणून निवड

राज्य औद्योगिक विकास महामंडळाला (आयडीसी) मिळालेल्या मध्य प्रदेश येथील कोळसा खाणींवर खाण विकासक आणि ऑपरेटर (एमडीओ) म्हणून एक्सवायकेनो या कंपनीची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ‘एमडीओ’साठी १० नोव्हेंबरपर्यंत इच्छाप्रस्ताव जारी केला जाईल, असे याआधी सांगण्यात आले होते. पण वेळ कमी असल्याने तत्काळ एमडीओची निवड करण्यात आली, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा