Goan Varta News Ad

चेन्नई सुपर किंग्ज विजयी

|
25th October 2020, 07:29 Hrs
चेन्नई सुपर किंग्ज विजयी

दुबई : सॅम करनची शानदार गोलंदाजी (१९ धावांत ३ बळी) आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या पहिल्या आयपीएल अर्धशतकामुळे चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आठ गडी राखून पराभव केला. सीएसकेने दोन गडी गमावल्यानंतर विजयासाठी १४६ धावांचे लक्ष्य साध्य केले. या मोसमात १२ सामन्यांत चेन्नईचा हा चौथा विजय आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने आरसीबीने ४ गड गमावून १४५ धावा केल्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी जोरदार फलंदाजी केली. या दोघांनी क्रीझवर जाताच फटके खेळण्यास सुरुवात केली आणि आरसीबी गोलंदाजांवर दबाव आणला. दोघांमध्ये ड्युप्लेसिस हा सर्वात धोकादायक होता. त्याने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. वेगवान फलंदाजीच्या प्रयत्नात तो ख्रिस मॉरिसचा बळी ठरला. पण त्याने पाच षटकांत संघाची धावसंख्या ५० धावांच्या जवळपास नेली.
ड्युप्लेसिसनंतर क्रीजवर आलेल्या अंबाती रायुडूनेही धावांचा वेग कमी होण्यास दिला नाही. गायकवाड याच्यासमवेत त्याने आरसीबी गोलंदाजांवर सतत आक्रमण केले. दोघांनी सीएसकेची धावसंख्या १०० च्या पलीकडे नेली. रायडूने २७ चेंडूत तीन चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. युजवेंद्र चहलचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न करताना तो त्रिफळाचीत झाला.
गायकवाडने ४२ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने पहिले आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. २३ वर्षांच्या या युवकाने पूर्वीच्या अपयशामधून शिकताना महत्त्वपूर्ण प्रसंगी संघासाठी जबरदस्त खेळी केली. रायुडू बाद झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आला व तोही आज रंगात दिसत होता. त्याने मॉरिसच्या चेंडूवर सलग दोन चौकार ठोकले आणि संघाला लक्ष्याच्या दिशेने नेले.
तत्पूर्वी विराट कोहलीचे अर्धशतक असूनही आरसीबीला सहा विकेट्सवर १४५ धावा करता आल्या. चेन्नईच्या गोलंदाजीसमोर संथ खेळपट्टीवर धावा करणे सोपे नव्हते. कोहलीने ४३ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत त्याने फक्त एक चौकार आणि एक षटकारच लगावला. त्याच्याशिवाय एबी डिव्हिलियर्सने ३६ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. आरसीबीने शेवटच्या तीन षटकांत केवळ २० धावा केल्या आणि त्यादरम्यान चार विकेट गमावल्या. चेन्नईकडून सॅम करनने तीन षटकांत १९ धावा देत ३ बळी, तर दीपक चहरने चार षटकांत ३१ धावा देऊन दोन गडी बाद केले.
आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अॅरोन फिंच (११ चेंडूंत १५) आणि देवदत्त पडीकल (२१ चेंडूंत २२) यांनी पहिल्या विकेटसाठी ३१ धावांची भागिदारी केली मात्र ही भागिदारी मोठी करण्यात त्यांना अपयश आले.
चेन्नईचा फिरकीपटू इम्रान ताहिर (चार षटकांत ३० धावा), मिचेल सँटनर (चार षटक, एक बळी व २३ धावा) आणि रवींद्र जडेजा (तीन षटकांत २० धावा) यांच्यासमोर डिव्हिलियर्स आणि कोहली उघडपणे खेळू शकले नाहीत. कोहलीने २८ व्या चेंडूवर पहिला चौकार ठोकला. १५ व्या षटकात आरसीबीने तिहेरी आकडा गाठला.