अर्थपूर्ण गीतांचा शायर

रुपेरी पडदा

Story: सौ. विद्या नाईक होर्णेकर |
25th October 2020, 01:02 pm
अर्थपूर्ण गीतांचा शायर

प्रख्यात ऊर्दू कवी, शायर व गीतकार साहिर लुधियानवी यांची आज पुण्यतिथी. आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या अनमोल रत्नांपैकी साहिर हे एक. त्यांच्याविषयी खरे तर आजतागायत खूप काही लिहिले गेले. मात्र, लिहिणाऱ्याची लेखणी कमी पडावी इतके त्यांचे कार्य अगाध आहे. त्यांच्या लेखणीतून निघालेल्या कवीता, गजल, गीते यांची तुलना इतर कुठल्याही गीताकारांशी करणे केवळ अशक्य. कारण ते स्वतंत्र शैलीचे अधिपती होते. त्यामुळे दिग्गजांच्या भाऊगर्दीतही त्यांचा ‘अंदाजे बयाँ कुछ और..’ असेच म्हणावे लागेल. 

साहिर यांच्या आशयघन व अर्थपूर्ण गीतांचे गारुड आजही रसिक श्रोत्यांवर कायम आहे. ८ मार्च १९२१ रोजी जन्मलेल्या साहिर यांचे मूळ नाव अब्दुल हाई. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली ती ‘साहिर लुधियानवी’ या टोपण नावाने. त्यांचा जन्म लुधियाना (पंजाब) येथील एका मुस्लिम गुज्जर जमीनदार घराण्यात झाला. असे सांगितले जाते की, इंग्रजांशी निष्ठा राखून असलेले, त्यांचे वडील फाझल मुहंमद हे कमालीचे विलासी व स्वच्छंदी होते. साहिर यांची आई सरदार बेगम ही त्यांची अकरावी पत्नी. त्या अत्यंत स्वाभिमानी होत्या. परिस्थितीने त्यांची गाठ फाझल यांच्याशी बांधलेली असली तरी पतीची जीवनशैली त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले व ते विकोपाला जाऊन त्यांनी परस्परांपासून फारकत घेतली. साहिरांचा ताबा न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिला. मात्र, या सगळ्याचा त्यांच्या बालमनावर इतका दुष्परिणाम झाला की, तो अगदी मरेपर्यंत त्यांच्या मनावर कायम राहिला. आर्थिक विवंचना, अनामिक भिती व दु:ख अशा वातावरणात झालेल्या त्यांच्या जडणघडणीचे तीव्र पडसाद त्यांच्या काव्यातूनही उमटले. त्यात शैक्षणिक स्तरावरही त्यांना अनेक चढउतार पहावे लागले.

त्यांनी उच्च शिक्षणासाठी लुधियानाच्या शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, साम्यवाद्यांचे नेतृत्व करणाऱ्या ‘ऑल इंडिया स्टूडन्ट्स फेडरेशन’ या विद्यार्थी संघटनेतील त्यांचा सक्रिय सहभाग, तसेच खेडोपाडी जाऊन तेथील शेतकऱ्यांना आंदोलनास प्रवृत्त करण्यासारख्या त्यांच्या कृती, सदर महाविद्यालयाला मान्य नसल्याने तिथून त्यांची उचलबांगडी झाली. त्यानंतर लाहोरच्या ‘दयाळसिंग’ महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला परंतु तेथूनही त्यांना त्याच कारणास्तव बाहेर पडावे लागले. परिस्थितीवर मात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बिकट परिस्थितीची झळ सोसल्याने समदु:खींविषयी साहिरांना कणव होती. त्यातूनच मग त्यांच्या लेखणीला धार आली व त्यांनी काव्यलेखनातून आपली व्यथा मांडण्यास सुरुवात केली.

‘अदब-इ-लतिफ (लाहोर), सवेरा (लाहोर), शाहकार (दिल्ली)’ अशा काही नियतकालिकांच्या संपादनाचे कार्य त्यांनी काही काळ केले. काही काळ बेकारीतही गेला. नोकरीच्या शोधात त्यांना विविध ठिकाणी हिंडावे लागले व या भटकंतीत त्यांना अनेक कटू अनुभवही आले. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर साहिर मुंबईत आले आणि हिंदी चित्रपटांसाठी गीते लिहू लागले. संगीतकार एस. डी. बर्मन यांच्यासोबत साहिर यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. पहिल्याच भेटीत सचिनदांना साहिर यांनी काही ओळी लिहून दिल्या. ‘ठंडी हवाए लहराके आये, रुत है जवाँ, तुम हो यहाँ, कैसे भुलायें...’ १९५१ मध्ये आलेल्या ’नौजवान’ चित्रपटात या गीताचा समावेश झाला आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सचिनदासोबत त्यांनी अनेक अविस्मरणीय गीते दिली. मात्र, प्रसिद्धीची नशा म्हणा की, या जोडीचे दुर्दैव... गुरु दत्त यांच्या ’प्यासा’ चे यश हे फक्त त्यातील गीत रचनांमुळं आहे, संगीतामुळं नव्हे अशी दर्पोक्ती साहिर यांनी केली. त्यामुळे संगीतकार सचिनदा दुखावले गेले व ही जोडी फुटली ती कायमची...

‘प्यासा’तील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या. त्यातही ‘ ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है...’ म्हणजे हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासातील ‘मैलाचा दगड’. साहिर यांनी शेकडो गीते लिहिली. त्यापैकी ‘प्यासा (१९५७), नया दौर (१९५७), धूल का फूल (१९५९), बरसात की रात (१९६०), फिर सुबह होगी, वक्त, ताजमहाल, हम दोनो (१९६१), गुमराह (१९६३), चित्रलेखा (१९६४), कभी कभी (१९७६) इ. चित्रपटांतील त्यांची गीते रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. गुरू दत्त यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या ‘बाजी’ चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले...’ या गीतानं लोकप्रियतेचे इतके उच्चांक गाठले की, अभिनेते देवानंद यांनी सांगितल्याप्रमाणे, हे गीत ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे. प्रेम असो की वेदना, साहिर यांनी आपल्या लेखणीतून त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. साहिरांच्या काव्यसंग्रहांत ‘तल्खीयां (१९४४), परछाइयां (१९५५)’ आणि ‘आओ के कोई ख्वाब बूनें (१९७३)’ यांचा समावेश आहे. तसेच सम्राट (१९४५), तानिया (१९४५) ही अनुवादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. देवींद्र सत्यार्थी (१९४८) हे गद्य चरित्रही त्यांनी लिहिले. 

साहिर यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार व मानसन्मान प्राप्त झाले. १९७१ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री प्रदान केली. याशिवाय ‘सोव्हिएट लँड-नेहरु पुरस्कार’ (१९७३) व ‘महाराष्ट्र उर्दू अकादेमी पुरस्कार ’ (१९७३) देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. गायक व संगीतकार यांच्या बरोबरीनेच चित्रपटगीतकारांनाही सन्मान, प्रतिष्ठा व स्वामित्वशुल्क मिळावे, यासाठी साहिर यांनी अविरत लढा दिला व गीतकारांना चित्रपटव्यवसायात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांची कर्मभूमी ठरलेल्या मुंबईतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. २५ ऑक्टोबर १९८० रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या गीतांच्या रुपात ते अजरामर आहेत.

(लेखिका नामवंत सिनेसमीक्षक आहेत.)