समोर या, स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार दाखवतो

महापौर मडकईकरांचे कुंकळ्येकरांना आव्हान; पर्रीकरांचा विश्वासघात केल्याचाही आरोप


24th October 2020, 10:22 pm
समोर या, स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार दाखवतो

फोटो : उदय मडकईकर

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : आमदार आणि स्मार्ट सिटी मंडळावर असताना सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी स्मार्ट सिटीच्या अनेक कामांत भ्रष्टाचार केला आहे. हिंमत असेल तर त्यांनी आमने-सामने यावे. त्यांचे भ्रष्टाचार आम्ही त्यांच्यासमोर ठेवू, असे आव्हान महापौर उदय मडकईकर यांनी दिले. ज्यांच्या जिवावर राजकारण केले त्याच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा कुंकळ्येकरांनी विश्वासघात केला, असा आरोपही त्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

स्मार्ट सिटीच्या कामात आपण भ्रष्टाचार केल्याचे पुरावे सादर करा. मी राजकारण सोडतो, असे आव्हान शुक्रवारी सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिले होते. त्यांना मडकईकर यांनी शनिवारी सडेतोड उत्तर दिले. तीन वर्षे आमदार आणि स्मार्ट सिटीच्या मंडळावर संचालक म्हणून कार्यरत असताना सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी कोणतीही लोकोपयोगी कामे केली नाहीत. त्यामुळेच पणजीतील कचरा, रस्ते, गटारे, पदपथ, मलनिस्सारण वाहिन्यांच्या समस्या कायम राहिल्या. आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी इमारत नूतनीकरण, पुलांची डागडुजी, सीसीटीव्ही कॅमेरे आदी कामे त्यांनी हाती घेतली. त्यात मोठा आर्थिक घोटाळा केला. त्यांनी केलेले भ्रष्टाचार पणजीवासीयांना माहीत होते. त्यामुळेच गेल्या पोटनिवडणुकीत जनतेने त्यांना घरी बसवले. शिवाय विद्यमान भाजप सरकारनेही त्यांच्याकडील सर्व पदे काढून घेतली, असे मडकईकर म्हणाले.

पणजीत गेल्या अनेक वर्षांपासून कचर्‍याचा प्रश्न आहे. त्यावर आमदार म्हणून कुंकळ्येकर यांनी कोणताही तोडगा काढला नाही. शेवटी बाबूश मॉन्सेरात यांनी आमदार झाल्यानंतर बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्पाला चालना देऊन कचरा प्रश्नावर कायमची मात करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याशिवाय पणजीतील रस्ते, पदपथ तसेच नागरिकांसाठी आवश्यक कामेही त्यांनी सुरू केली आहेत. कुंकळ्येकरांच्या काळात पावसाच्या पाण्यात बुडणारी अर्धी पणजी गेली दोन वर्षे त्यापासून दूर राहिली, हे कुंकळ्येकरांनी लक्षात घ्यावे व त्यानंतरच बोलावे, असा टोलाही मडकईकर यांनी लगावला.

उत्पलवरूनही साधला निशाणा

सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना नेहमीच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा वरदहस्त लाभला. त्यामुळेच ते आमदार आणि विविध सरकारी महामंडळांवर पोहोचू शकले. पर्रीकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजीची उमेदवारी उत्पल पर्रीकर यांना मिळावी यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण तसे न करता त्यांनी ती स्वत:च्या पदरात पाडून घेतली. यावरून त्यांनी मनोहर पर्रीकरांचा विश्वासघात केल्याचेच स्पष्ट होते, असेही महापौर मडकईकर यांनी नमूद केले.

भाऊंनी बायंगिणीला विरोध करू नये !

राजधानी पणजी तसेच संपूर्ण तिसवाडी तालुक्याला बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्पाची गरज आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी याचा गांभीर्याने विचार करावा व प्रकल्पाला विरोध करू नये, अशी विनंतीही महापौर मडकईकर यांनी केली. या प्रकल्पाला गती देऊन तो लवकरात लवकर पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.