चोर्ला घाट महामार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी

जिल्हाधिकार्‍यांचे आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश


24th October 2020, 10:12 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वाळपई : गोवा व कर्नाटक राज्यांना जोडणार्‍या चोर्ला घाटातून अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यात आल्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित खात्यांना दिले आहेत.

याची कठोरपणे अंमलबजावणी झाल्यास चोर्ला घाट मार्गे बेळगाव भागात जाणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या वर्षभरात दोन वेळा जिल्हाधिकार्‍यांनी असा आदेश दिला आहे. यापूर्वी याची कठोरपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसले नाही. कारण घाटातून अवजड प्रकारची वाहतूक सुरूच होती. बेळगावला जाण्यासाठी चोर्लामार्ग सोयीचा पडतो. या मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. पावसाळ्यापूर्वी या मार्गावर खड्डे निर्माण झाले होते. पावसाळ्यात या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची भीतीही असते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी या घाटातून अवजड वाहतुकीला बंदी घातली होती. मात्र त्याची शंभर टक्के अंमलबजावणी न झाल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे.