मेहबूबा मुफ्तींचा फुत्कार

- कलम ३७०साठी देशाच्या ध्वजाला मानले दुय्यम

Story: श्रीनगर : |
24th October 2020, 01:36 am
मेहबूबा मुफ्तींचा फुत्कार

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरचा गेलेला विशेष दर्जा परत मिळवण्याचा विडा पीडीपीच्या नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी उचलला आहे. जोपर्यंत ३७० कलम पुन्हा लागू होत नाही तो पर्यंत आपण निवडणूक लढणार नाही, अशी घोषणाच मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. इतकेच नाही तर याही पुढे जाऊन जोपर्यंत माझा झेंडा मिळत नाही तो पर्यंत मी तो झेंडा उचलणार नाही, असेही त्या म्हणाल्या. भारताला केवळ जम्मू आणि काश्मीरची जमीन हवी आहे. जम्मू आणि काश्मीरचे लोक नकोत, असे वक्तव्यही त्यांनी पुढे केले. जो पर्यंत कलम ३७० पुन्हा लागू केले जात नाही, तो पर्यंत मी दुसरा कोणताही झेंडा उचलणार नसल्याचे त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या टेबलवर जम्मू आणि काश्मीरच्या झेंड्यासह पक्षाचा झेंडा ठेवला होता. 

भाजपकडून तीव्र नाराजी 

मेहबूबा यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन झेंडे असण्याचा काळ आता गेला असून एक विधान, एक निशाण, एक प्रधान हे भाजपचे वचन होते. सत्तेत आल्यानंतर आम्ही ते वचन पूर्ण केले, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कवींद्र गुप्ता यांनी म्हटले आहे.