फोडणी आणखी महागणार!

कांद्यासह भाज्यांचे दर गगनाला


21st October 2020, 12:12 am
फोडणी आणखी महागणार!

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : महाराष्ट्र, कर्नाटकातील मुसळधार पावसामुळे गोव्याला कांद्यासह इतर पालेभाज्यांसाठी मध्य प्रदेशवर अवलंबून रहावे लागणार आहे. पुढील काळात कांद्याची आणखी टंचाई जाणवणार असल्याने फलोत्पादन महामंडळासह खुल्या बाजारातील कांद्याचे दर प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजीपाल्यासाठी गोवा प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकवर अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्ही राज्यांत मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे कांद्यासह इतर भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेळगावातील बाजारपेठेत मध्य प्रदेशातून येणार्‍या कांद्याची गोवाही आयात करत आहे. पूर्वी मध्य प्रदेशातून बेळगावात दररोज ७० ते ८० कांद्याचे ट्रक येत होते. सध्या ही संख्या २० येऊन ठेपली आहे. त्यामुळे गोव्याला पुरेशा प्रमाणात कांदा मिळणे कठीण झाले आहे. याच कारणामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी फलोत्पादन महामंडळात कांदा ७२ रुपये तर खुल्या बाजारात ८५ ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला. पण पुढील दोन-तीन दिवसांत तो शंभर रुपयांच्या आसपास जाऊ शकतो, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले. टंचाईमुळे महाराष्ट्र, कर्नाटकातून येणार्‍या भाजीपाल्याची आयात काही प्रमाणात कमी झाली आहे. पण फलोत्पादन महामंडळाची भाजी राज्यभरातील सर्वच स्टॉल्सना पुरेल, याची काळजी महामंडळ घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अगोदरच लॉकडाऊनमुळे गोमंतकीयांचे आर्थिक उत्पन्न मंदावले आहे. त्यात आता भाज्यांचे दरही वाढत आहेत. भविष्यात या दरांत आणखी वाढ झाल्यास सर्वसामान्य जनतेने खायचे काय, असा सवाल पणजी मार्केटमध्ये आलेल्या एका ग्राहकाने उपस्थित केला.


हेही वाचा