फोंडा पोलिसांवर हल्ला; दोघा संशयितांना अटक

फोंडा पोलिसांनी मंगळवारी बेळगाव व पेडणे येथून घेतले ताब्यात


20th October 2020, 11:50 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

फोंडा : कुर्टी फोंडा येथे सोमवारी सायंकाळी अमलीपदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेले फोंडा पोलिस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र गावडे आणि कर्मचारी जयवंत भूर्तु यांच्यावर बाटलीने प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या दोन्ही संशयितांना फोंडा पोलिसांनी मंगळवारी बेळगाव व पेडणे येथून ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. 

शुभम संजय नाईक सावंत (२६, रा. पंडितवाडा, फोंडा) आणि कृष्णा शेर बहादूर खडका (३०, रा. मूळ नेपाळ, सध्या हौसिंग बोर्ड, कुर्टी) अशी संशयितांची नावे आहेत. यातील शुभम याला मंगळवारी सकाळी बेळगाव पोलिसांच्या मदतीने बेळगाव येथून, तर कृष्णा खडका याला संध्याकाळी पेडणे येथून ताब्यात घेण्यात आले. कृष्णा खडका पणजी येथील एका रेस्टॉरन्टमध्ये कामाला असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. तो पणजीपर्यंत आपल्या दुचाकीने गेला. नंतर आंध्र प्रदेशमध्ये नोंद झालेल्या आंतरराज्यीय बसच्या सीटखाली लपून परराज्यात पळून जाण्याच्या तो प्रयत्नात होता. फोंडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात ३०७ (खुनाचा प्रयत्न करणे), ३५३ (सरकारी कर्मचार्‍याला मारहाण करणे) कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज काणकोणकर पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा