निष्काळजीपणा टाळा, सावधानता बाळगा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांशी संवाद


20th October 2020, 11:48 pm
निष्काळजीपणा टाळा, सावधानता बाळगा !

फोटो : देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

नवी दिल्ली : लस येत नाही तोपर्यंत आपल्याला करोनाशी युद्ध सुरूच ठेवायचे आहे. करोनाची लस कधी येईल, ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहोचेल यासाठी सरकारची पूर्ण तयारी झाली आहे. करोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकते. सावधगिरी बाळगून व्यवहार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पंतप्रधान पुढे म्हणाले, करोनाच्या संकटाशी आपण चांगली लढाई दिली आहे. सणवारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. मात्र लॉकडाऊन संपला असला तरीही विषाणू गेलेला नाही, हे विसरू नका. आता व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत.

आज देशात करोना रुग्णांसाठी ९० लाखांपेक्षा जास्त खाटा उपलब्ध आहेत. १२ हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. चाचण्यांची संख्या १० कोटींचा टप्पा ओलांडेल. आपण काही फोटो पाहतो आहोत त्यातून असे दिसते की काही लोक निष्काळजीपणा करत आहेत, मास्क लावत नाहीत. करोनाबाबतचे नियम पाळत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्ही केलेली एक चूक तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी धोकादायक ठरू शकते. सगळे आनंद साजरे करा, जबाबदारी म्हणून घराबाहेर पडा; पण करोना रोखण्यासाठी आवश्यक नियम पाळले गेलेच पाहिजेत. अद्याप करोनाची लढाई संपलेली नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

लस येईपर्यंत लढाई सुरूच ठेवा

अमेरिका, ब्राझीलमध्ये करोना रुग्णसंख्या कमी होत होती, पण आता पुन्हा वाढू लागली आहे. जोपर्यंत शेतमाल घरात येत नाही, तोपर्यंत काम पूर्ण होत नाही, असे संत कबीर म्हणून गेले आहेत. त्यामुळे करोनावर लस येत नाही, तोपर्यंत ही लढाई थोडीसुद्धा कमी होऊ द्यायची नाही. पहिल्यांदाच जागतिक पातळीवर करोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम होत आहे. भारतातही काही शास्त्रज्ञ काम करत आहेत, असे मोदी म्हणाले.

लक्षात ठेवा, लॉकडाऊन गेला, करोना नाही!

वेळेसोबत आर्थिक घडामोडींना चालना मिळत आहे. बहुतेक लोक आपल्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी, जीवनाला गती देण्यासाठी रोज घरातून बाहेर पडत आहेत. सणासुदीच्या दिवसांत बाजारात पुन्हा उत्साह संचारला आहे. लॉकडाऊन गेला असला तरी करोना विषाणू मात्र अद्याप गेलेला नाही. गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये प्रत्येक भारतीयाने केलेल्या प्रयत्नांसह सांभाळलेली परिस्थिती बिघडू द्यायची नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.

ही वेळ निष्काळजी होण्याची नाही. अनेक फोटो, व्हिडिओंमधून हे स्पष्ट दिसते की, अनेक लोकांनी सावधानता बाळगणे बंद केले आहे. ही चांगली गोष्ट नाही. मास्कशिवाय तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला, कुटुंबातील लहानग्यांना आणि वृद्धांना धोक्यात टाकत आहात. सणासुदीच्या काळात थोडाही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान


हेही वाचा