बाणावली येथील नागरिकांचा आपमध्ये प्रवेश

आगामी काळात आणखी बरेच लोक आम आदमी पक्षात प्रवेश करतील : राहुल म्हांबरे


20th October 2020, 11:45 pm
बाणावली येथील नागरिकांचा आपमध्ये प्रवेश

फोटो : आम आदमी पक्षात प्रवेश केलेल्या बाणावली येथील नागरिकांसमवेत आपचे नेते राहुल म्हांबरे व कार्यकर्ते.

प्रतिनिधी । गोवन वार्ता

मडगाव : बाणावली येथील नागरिकांनी एका औपचारिक समारंभात मंगळवारी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. आपचे निमंत्रक तथा नेते राहुल म्हांबरे आणि इतर सदस्य, तसेच पक्ष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बाणावली येथे मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता झालेल्या एका कार्यक्रमात बाणावलीसह वार्का, केळशी, कोलवा आणि कारमोणा भागातील नागरिकांनी पक्षात रितसर प्रवेश केला. वेन्झी व्हिएगश या बाणावली येथील सामाजिक कार्यकर्त्याने यासाठी पुढाकार घेताना या भागातील रहिवाशांना आपमध्ये प्रवेश करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. आप नेते राहुल म्हांबरे यांनी नव्या सदस्यांचे स्वागत करताना आगामी काळात आणखी बरेच लोक आम आदमी पक्षात प्रवेश करतील, असे मत व्यक्त केले. 

यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या बाणावली आणि इतर भागातील नागरिकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, आम आदमी पक्षाने सध्याच्या करोना संकटावेळी राज्यात जी कामगिरी केली, ती बघून त्यांनी आपमध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन प्रवेश केला असून उत्साहाने ते एका चांगल्या गोव्याच्या निर्माणासाठी कार्यरत राहणार आहेत. यावेळी आम आदमी पक्षाच्या ज्येष्ठ व वरिष्ठ नेत्यांनी आवर्जून उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले.

करोना काळातील पक्षाच्या कार्यामुळे लोक भारावले

कार्यक्रमात आपचे नेते राहुल म्हांबरे म्हणाले, बाणावली, वार्का, कोलवा आणि परिसरातील नागरिक लॉकडाऊन आणि करोना महामारीच्या काळात पक्षाने केलेल्या कार्यामुळे भारावून गेले आहेत. त्यांच्या हृदयात पक्षाबद्दल आस्था निर्माण झाली आहे. आम आदमी पक्षाचे इतर कार्यकर्ते नव्या सदस्यांचे सहृदयतेने मोठ्या मनाने स्वागत करत आहेत. आता त्या सर्वांनी गोव्याला भ्रष्टाचार आणि प्रशासकीय शक्तीचा दुरुपयोग होण्यापासून सध्याच्या सरकारला रोखले पाहिजे.