दाबोळी विमानतळ प्रवाशांच्या काळजीबाबत सतर्क

मंत्री गुदिन्हो यांचे कौतुकोद्गार : गोवा माईल्सच्या ‘अँटीव्हायरल व्हेहिकल कोटींग स्टेशन’चा शुभारंभ


20th October 2020, 11:44 pm
दाबोळी विमानतळ प्रवाशांच्या काळजीबाबत सतर्क

फोटो : वाहन सॅनिटाईझचे प्रात्यक्षिक पाहताना मंत्री मॉविन गुदिन्हो, गगन मलिक, पराशर पै खोत व इतर. (अक्षंदा राणे)

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वास्को : आपल्या वाहनांतील प्रवाशांचे विषाणूंपासून रक्षण व्हावे यासाठी गोवा माईल्सने उचललेली पावले कौतुकास्पद आहेत. यापूर्वी दाबोळी विमानतळावर येणार्‍यांना आयुर्वेदिक काढा दिला जात होता. दाबोळी विमानतळ प्रवाशांंची काळजी घेण्याच्या बाबतीत उच्च स्थानावर आहे, असे प्रतिपादन वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी मंगळवारी येथे केले.

गोवा माईल्सतर्फे दाबोळी विमानतळावरील ‘अँटीव्हायरल व्हेहिकल कोटींग स्टेशन’चा शुभारंभ मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोवा माईल्सचे पराशर पै खोत, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक गगन मलिक व मान्यवर उपस्थित होते. गोवा माईल्सची वाहने सॅनिटाईझ करण्यात येणार आहेत. त्यामुळे आपला प्रवासी सुरक्षित असावा असे गोवा माईल्सला वाटते हे दिसून येते, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. सर्वांनाच परवाने दिले तर भविष्यात टॅक्सींना पार्किंगसाठी जागाच उरणार नाही. यासाठी टॅक्सींचे ऑडिट करण्याची सूचना वाहतूक संचालकांना केली आहे. यासाठी टॅक्सीचालक, नागरिकांचे सहकार्य हवे. सध्या कोविडमुळे खबरदारी घ्यावी लागत आहे. विमानतळावर सुरू केलेल्या नॅनो तांत्रिक सुविधांमुळे पर्यटक मोसमाची वेगळ्या पद्धतीने सुरुवात करूया, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविडच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. टॅक्सी, हॉटेल्स व इतरांना व्यवसाय मिळण्यासाठी गोव्यात पर्यटक येण्याची नितांत गरज आहे. डिसेंबरपर्यंत पर्यटक पूर्वीप्रमाणे येतील, अशी आशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोविडसंबंधी योग्य मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात येत आहे. पर्यटनासाठी गोवा सुरक्षित आहे ही माहिती पर्यटकांपर्यंत गेल्यावर ते गोव्यात येतील, असे ते म्हणाले.

गोवा माईल्सच्या वाहनांमध्ये सॅनिटायझरचा स्प्रे मारण्यात येईल. ही मात्रा ९० दिवसांपर्यंत संरक्षण देते. आमच्या वाहनांमध्ये प्रवासी बसतात, उतरतात. त्यामुळे ९० दिवसांची प्रतीक्षा का करावी, असा विचार करून आम्ही सदर कालावधी ३० दिवसांवर आणला आहे. सदर वाहन सॅनिटाईझ केल्याची माहिती ग्राहकांना सहज उपलब्ध केली जाईल. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित वाटेल.

- पराशर पै खोत, गोवा माईल्स


हेही वाचा