वीजवाहिनी पडल्याने धावती दुचाकी खाक

युवक जखमी; उपचारासाठी मडगाव येथील खासगी इस्पितळामध्ये दाखल


19th October 2020, 11:41 pm
वीजवाहिनी पडल्याने धावती दुचाकी खाक


प्रतिनिधी । गोवन वार्ता

वास्को : जीवंत वीजवाहिन्या धावत्या दुचाकीवर पडल्याने महेश दोडमणी (३४) हा युवक सोमवारी जखमी झाला. या घटनेत त्याची मोटारसायकल पूर्णपणे जळाली. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाने त्वरित तेथे येऊन आग विझविली. जखमी महेशला उपचारासाठी मडगाव येथील खासगी इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले आहे.

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका आस्थापनामध्ये काम करणारा महेश दोडमणी सोमवारी दुपारी घरी जेवणासाठी जात होता. तो दुचाकीसह वेर्णा औद्योगिक वसाहतीतील फिनोलेक्स कंपनीसमोर पोहचला असता एक जीवंत वीजवाहिनी तुटून त्याच्या दुचाकीवर पडली. यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. यात त्याचे खाद्यांचे हाड मोडले. दुचाकीचा जीवंत वीजवाहिनीशी संपर्क आल्याने तिने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे येऊन आग विझविली. या घटनेते महेश सुदैवाने बचावला.