आयआयटी प्रकल्पासाठी सांगेवासीय तयार : गावकर

स्थानिकांचा विरोध न होण्याचीही सरकारला हमी


19th October 2020, 11:35 pm
आयआयटी प्रकल्पासाठी सांगेवासीय तयार : गावकर

फोटो : प्रसाद गावकर

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : आयआयटी प्रकल्पाच्या स्वागतासाठी आपण तयार आहे. सांगे मतदारसंघात तीन ठिकाणी जागा उपलब्ध आहेत. तेथे कोणताही विरोध होणार नाही. शिवाय झाडेही कापावी लागणार नाहीत. त्यामुळे मेळावलीवासीयांच्या विरोधामुळे सरकार प्रकल्पासाठी सांगेचा विचार करत असेल तर आपणास काहीही हरकत नाही, असे आमदार प्रसाद गावकर यांनी स्पष्ट केले.

सोमवारी ते पत्रकारांशी बोलत होते. आयआयटी प्रकल्पासाठी याआधी सांगेचीच निवड झाली होती. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही आयआयटी प्रकल्प सांगे मतदारसंघातच उभारण्याचे आश्वासन दिलेले होते. पण काही कारणांमुळे त्यावेळी हा प्रकल्प येथून हलविण्यात आला. आता हा प्रकल्प शेळ-मेळावली येथे उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण स्थानिकांनी प्रकल्पाला तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकल्प इतर ठिकाणी नेण्याचा विचार केल्यास त्यासाठी सांगेच योग्य आहे. सांगेमध्ये सरकारच्या मालकीच्या दोन आणि खासगी सोसायटीची एक जागा आहे. तीनपैकी एका ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे निश्चित केल्यास कोणाचाही विरोध होणार नाही, असेही गावकर यांनी नमूद केले.

विश्वासात न घेतल्याने लोकांचा विरोध

शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध का होत आहे, याचा सरकारने विचार करायला हवा. प्रकल्पासाठी जागा निवडताना सरकारने स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे होते. प्रकल्पाचे फायदे आणि नुकसान या दोन्ही गोष्टी जनतेला सांगायला हव्या होत्या. सरकारने तसे काहीच न करता जागा संपादित केली. त्यामुळेच विरोध वाढत आहे, असेही आमदार प्रसाद गावकर यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा