कोविडमुळे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या!

गोंयचे राखणदारतर्फे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर


19th October 2020, 10:56 am
कोविडमुळे बळी पडलेल्यांच्या  कुटुंबियांना आर्थिक मदत द्या!

फोटो : उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांना निवेदन देताना गोंयचो राखणदारचे पदाधिकारी. 

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वास्को : कोविडमुळे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी. कोविड संक्रमितांची योग्य प्रकारे निगा राखून त्यांना सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी करणारे निवेदन गोंयचे राखणदार संस्थेतर्फे मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांना देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे समन्वयक दीपेश नाईक, सुभाष केरकर, हरिश्चंद्र नाईक, दुर्गादास गावकर, श्रीकांत पालसकर, श्रेया पालसकर उपस्थित होते.

सुभाष केरकर म्हणाले की, कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर तालुका, ग्राम पातळीवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात यावी यासंबंधीचे निवेदन प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व सोयींनीयुक्त कोविड केअर केंद्र व विलगीकरण केंद्र उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. घरांमध्ये विलगीकरण, अलगीकरणामध्ये राहिलेल्यांना योग्य औषधोपचार व अन्य वैद्यकीय सेवा पुरविण्याची गरज आहे.

श्रीकांत पालसकर म्हणाले की, आता कोविड संक्रमितांची संख्या वाढत असल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे. या गोष्टीला सरकारच जबाबदार आहे. कोविडसंबंधी आरंभीच्या काळात जी काळजी घेतली पाहिजे होती, ती काळजी सरकारने घेतली नाही. कोविड उपचार दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली न आणून सरकारने करोना संक्रमितांवर अन्याय केला आहे. दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना कोविड उपचारासाठी सुरू करण्यात यावी.

दीपेश नाईक यांनी कोरोनामुळे लोकांना आर्थिक फटका बसला असल्याचे सांगितले. कोविडमुळे बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी तसेच कोविडमुळे बरोजगारी वाढल्याने रोजगार निर्मितीसाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.