किनारी भागात पार्ट्या; करोनाबाधित वाढण्याची भीती

मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन : कारवाई करण्याची नागरिकांतून मागणी


19th October 2020, 10:49 am
किनारी भागात पार्ट्या; करोनाबाधित वाढण्याची भीती

प्रतिनिधी । गोवन वार्ता

म्हापसा : जगभरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. गोव्यातही करोनाच्या संसर्गामुळे पाचशेहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. हा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन प्रयत्नरत आहे; पण बार्देश तालुक्यातील किनारी भागातील प्रमुख क्लब व रेस्टॉरन्टमध्ये मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करून पार्ट्यांचे आयोजन सुरूच आहे. आयोजक तसेच या लोकांमधील करोनाची भीती नष्ट झाली आहे का, असा प्रश्न या भागातील लोकांना पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरपासून किनारी भागात पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात आहे. केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजनास अनुमती दिली आहे. वागातोरसारख्या समुद्र किनारी लॉकडाऊनमध्येही पार्ट्यांचे सर्रासपणे आयोजन होत होते. या क्लब व रेस्टॉरन्टवर अद्याप कारवाई झालेली नाही. राजकीय मंडळी, पोलिस व प्रशासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून आयोजक मंडळी पार्ट्यांचे शुक्रवार, शनिवार व रविवार या विक एण्ड दिवशी सर्रासपणे आयोजन करत आहेत.

शनिवारी १७ रोजी रात्री कळंगूट, बागा व शिवोली येथील नाईट क्लब व रेस्टॉरन्टमध्ये नियमांचे व मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून पार्ट्यांचे आयोजन झाले. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. त्यात देशी तसेच विदेशी पर्यटकांचा समावेश होता. या क्लब व रेस्टॉरन्टनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पार्ट्यांचे व्हिडीओ टाकले होते. काही सोशल मीडियावर या पार्ट्यांचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते. रविवारी सकाळी हे व्हिडिओ इतर सोशल मीडियांवर व्हायरल झाले. त्यामुळे अनेकांनी या पार्ट्यांवर आक्षेप घेतला.

गोवा करोनाचा हॉटस्पॉट बनण्याची भीती

केंद्र सरकारने आता खुल्या वातावरणातील क्लब व रेस्टॉरन्टना मनोरंजनात्मक कार्यक्रमाची परवानगी दिली आहे. अनलॉकमुळे गोव्यात हळूहळू पर्यटक येऊ लागले आहेत. समुद्र किनारी हॉटेल व रेस्टॉरन्टमध्ये लोकांची रेलचेल वाढली आहे. गोव्यात दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित सापडत आहेत. अशा पार्ट्यांमुळे बाधितांची संख्या वाढून गोवा करोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय यंत्रणा याकडे जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याची भावना जनतेची बनली आहे. 

रेस्टॉरंटमधील पार्ट्यांमध्ये सामाजिक अंतराचे पालन व मास्कचा वापर आदी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे अशक्यच. वागातोर भागात शुक्रवार ते रविवारपर्यंत पार्ट्यांचे बिनधास्तपणे आयोजन केले जात आहे. या पार्ट्यांना हणजूण पोलिस निरीक्षकांचा वरदहस्त आहे. तेथील एक उपनिरीक्षक अनैतिक धंद्यांचा एजन्ट बनला आहे. त्यामुळेच या पार्ट्या खुलेआम सुरू असतात.

- विनोद पालयेकर, आमदार