युद्ध सरावात चीनने सीमेवर डागली क्षेपणास्त्रे

भारताला चिथावण्याचे प्रकार सुरूच


18th October 2020, 11:19 pm

नवी दिल्ली : भारताच्या सीमेला लागून असलेल्या भागात युद्धाभ्यास करताना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने शनिवारी सीमेवर काही क्षेपणास्त्र डागली. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने या क्षेपणास्त्रांची छायाचित्रे रविवारच्या अंकात प्रकाशित केली. भारतीय जवानांनी मात्र संयम राखत, कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
मागील काही महिन्यांपासून लडाखच्या पूर्व सीमेवर प्रचंड तणाव आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनयिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्याही सुरू आहेत. सीमेवर शांतता कायम राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याच्या गप्पा वारंवार करणाऱ्या ड्रॅगनने आपले शेपूट मात्र वाकडेच ठेवले आहे, हेच या घटनेवरून दिसून येते.
तिबेटमध्ये चीनच्या सैनिकांचा सुमारे ४७ हजार फूट उंचीवर युद्धसराव पार पडला. चिनी सैनिकांनी ड्रोन्स आणि रॉकेट लॉन्चर्सच्या मदतीने निर्धारित लक्ष्यांवर क्षेपणास्त्र डागली. यात वापरण्यात आलेली शस्त्रे नवी आणि अत्याधुनिक आहेत, असेही या लेखात म्हटले आहे.