गुर्जर समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक

राजस्थानात गेहलोत सरकारला १ नोव्हेंबरचा अल्टिमेटम


18th October 2020, 11:17 pm

जयपूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजस्थानमध्ये गुर्जर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १ नोव्हेंबरपासून राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाईल, असा इशाराच गुर्जर समाजाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारला दिल्या आहेत.
भरतपूर येथे गुर्जर समाजाची महापंचायत पार पडली. गुर्जर नेता किराडी सिंह बैंसला यांनी ही महापंचायत बोलावली होती. २०११ ते २०१९ पर्यंत सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी या महापंचायतीत करण्यात आली.
राजस्थानमध्येही गुर्जर समाजाने आक्रमक पवित्रा घेतल्याच्या या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील काँग्रेस सरकार या आंदोलनाला कसे हाताळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राजस्थान बंद करण्याचा इशारा
भरतपूर येथे पार पडलेल्या महापंचायतीनंतर किराडी सिंह बैंसला यांचे पुत्र विजय बैंसला यांनी गेहलोत सरकारला राजस्थान बंदचा इशारा दिला. सध्या येथील काही भागांत पीक काढणी सुरू आहे, तर कुठे पेरणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे आम्ही सरकारला १ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. पण सरकारने नोव्हेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर राजस्थान बंद करू, असा इशाराच बैंसला यांनी दिला आहे.
काय आहेत गुर्जर समाजाच्या मागण्या?
– एमबीसीअंतर्गत आरक्षण देण्यात यावे
– राज्यात सध्या ज्या १५ प्रकारच्या भरती सुरू आहेत, त्यात ५ टक्के आरक्षण मिळावे.
– गुर्जर समाजाच्या मागच्या आंदोलनात ज्यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी
– देवनारायण योजना गुर्जर समाजाला लागू करावी