माजी मुख्यमंत्री कमलनाथांची जीभ घसरली

भाजपच्या महिला उमेदवाराला म्हणाले 'आयटम'


18th October 2020, 11:16 pm

भोपाळ : बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्ये पोटनिवडणूक सुरू आहे. मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष आहे. पण पोटनिवडणुकीतील प्रचारसभेदरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल असभ्य भाषेत टीका केली. यामुळे कमलनाथ हे वादात सापडले आहेत. भाजपनेही त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मध्य प्रदेशातील डबरा येथील काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र राजेश यांच्या प्रचारासाठी कमलनाथ आले होते. यावेळी कमलनाथ यांनी प्रचारसभेत भाषण केले. 'सुरेंद्र राजेश हे आमचे उमेदवार आहेत. ते चांगल्या स्वभावाचे आहेत. हे त्यांच्यासारखे नाही, काय नाव त्यांचे? (इम्रती देवी, माजी राज्यमंत्री) मी काय त्यांचे नाव घेऊ. माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना चांगले ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला हवे होते. 'ही काय आयटम आहे', असे कमलनाथ म्हणाले.
इम्रती देवी या माजी आमदार आहेत. इम्रती देवी यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. इम्रती देवी या भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदेंच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. दरम्यान, भाजपने कमलनाथ यांच्याविरोधात या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.