हैदराबादमध्ये मुसळधार पावसाचा कहर

महापुरात ५० जणांचा मृत्यू; छतावर संसार थाटण्याची वेळ


18th October 2020, 11:15 pm

हैदराबाद : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हैदराबादमध्ये महापूर आल्यासारखी परिस्थिती झाली आहे. तब्बल ५० लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे तर हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये शनिवारी रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली, ज्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली तर काही वेळातच रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली. शहरामध्ये तब्बल १५० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
तेलंगण, आंध्र प्रदेश येथेही मुसळधार पावसामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. येथील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. दुसरीकडे नागरिकांच्या घरात खूप पाणी शिरल्याने छतावर संसार थाटण्याची वेळ आली आहे. जनावरांना छतावर नेता येऊ शकत नाही त्यामुळे ते पाण्यात उभ्या आहेत. तर गाड्या वाहून जात आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शहरांत पाणी शिरल्यामुळे अनेक लोक कार्यालये आणि घरांमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी सैन्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलातील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याची तिव्रता आणखी वाढली आहे. तेलंगाना राज्याव्यतिरिक्त पुराचा फटका आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या शेजारच्या राज्यांनाही बसला आहे.