बदलत्या संदर्भातली नवरात्र

परामर्श

Story: आरती देशपांडे पुणे |
18th October 2020, 01:48 pm
बदलत्या संदर्भातली नवरात्र


नवरात्रीच्या निमित्ताने घरोघरी होणारा आदिशक्तीचा जागर नवचैतन्य देणारा आहे. त्यामुळे सर्वप्रथम दारी आलेल्या आदिशक्तीचं स्वागत करु या. पण हा समारंभ पार पाडताना कोव्हिड संसर्गामुळे उद्भवलेल्या सध्याच्या स्थितीचं भानही राखू या. कारण पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. प्रत्येकाच्याच आयुष्याला कमालीचा वेग होता. स्पर्धात्मक युगात आणि जागतिकीकरणाच्या दबावाखाली वावरताना एक प्रकारची व्यग्रता आणि व्यस्तता आपण प्रत्येकजण अनुभवत होतो. पण आता करोनामुळे या वेगावर बंधन आलं आहे. त्याचबरोबर आपल्याला सोशल डिस्टंसिंग, सार्वजनिक ठिकाणी मर्यादित वावर आदी पथ्यं पाळावी लागणार आहेत. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात पूर्वीसारखी लगबग अथवा धावपळ असणार नाही. हीच खरी संधी आहे या सणाविषयी चिंतन आणि मनन करण्याची, उत्सवातली प्रतिकात्मकता शोधण्याची आणि सणाचा नेमका सांगावा जाणून घेण्याची. म्हणूनच प्रत्येकाने ही संधी साधायला हवी. सामान्य भारतीय माणसाला आध्यात्मिक बैठकीचा उत्तम वारसा लाभला आहे. अद्यापही प्रत्येक घरातला एखादा कोपरा देवघरासाठी राखून ठेवलेला असतो. भौतिक सुखाबरोबरच त्याला आत्मिक समाधानाचीही गरज असते. म्हणूनच आजही आपापले व्याप-ताप सांभाळून कुळधर्म-कुळाचारांचं पालन होताना दिसतं. अशा कुळाचारांमधला वर्षभरातला सर्वात मोठा कुळाचार असतो तो शारदीय नवरात्रीचा. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करुन घरोघरी या उत्सवाचा प्रारंभ होतो.

घटस्थापना करताना एका तांब्याच्या कलशावर अथवा मातीच्या घटावर पूर्णपात्र ठेवून त्यात देवीची स्थापना करतात. म्हणजेच देव्हाऱ्यातल्या देवीचे त्याचबरोबर कुलदेवतेचे टाक पूर्णपात्रात ठेवले जातात. अशा प्रकारे कुलस्वामिनीची विधिवत स्थापना करताना अन्यही काही पूजाविधी संपन्न होतात. त्यामध्ये शेतातली माती एका पत्रावळीवर पसरून त्यावर कलशस्थापना केली जाते. या मातीत मूठभर धान्य पेरतात त्यात साळ, जव, तीळ, उडीद, राळे, गहू आणि मसूर या सप्तधान्यांचा समावेश असतो. अर्थात स्थानपरत्वे वा उपलब्धतेनुसार यात बदल होऊ शकतो. अशा प्रकारे सप्तधान्य पेरण्यामागील उद्देश कृषिप्रधान देशाची ओळख जपणं आणि ते सर्वांच्या मनावर बिंबवणं हाच आहे. खेरीज शेती व्यवसायाचं प्राधान्य जाणवून देण्याचा आणि जपण्याचा उद्देशही यातून प्रतित होतो. शेती हाच मानवी अस्तित्वाचा मुख्य आधार असल्याचा हा विचार या उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक संकल्पनेत बांधला गेल्याचा अर्थ आपल्याला काढता येईल. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवापुढे अखंड नंदादीप लावला जातो. अज्ञानरुपी अंधाराचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सदोदित लाभावा हीच यामागील कल्पना आहे आणि या ज्ञानरूपी प्रकाशानं आपलं आयुष्य उजळून निघावं हीच यामागील मंगल कामना आहे.

घटस्थापना करताना एका तांब्याच्या कलशावर अथवा मातीच्या घटावर पूर्णपात्र ठेवून त्यात देवीची स्थापना करतात. म्हणजेच देव्हाऱ्यातल्या देवीचे त्याचबरोबर कुलदेवतेचे टाक पूर्णपात्रात ठेवले जातात. अशा प्रकारे कुलस्वामिनीची विधिवत स्थापना करताना अन्यही काही पूजाविधी संपन्न होतात. त्यामध्ये शेतातली माती एका पत्रावळीवर पसरुन त्यावर कलशस्थापना केली जाते. या मातीत मूठभर धान्य पेरतात त्यात साळ, जव, तीळ, उडीद, राळे, गहू आणि मसूर या सप्तधान्यांचा समावेश असतो. अर्थात स्थानपरत्वे वा उपलब्धतेनुसार यात बदल होऊ शकतो. अशा प्रकारे सप्तधान्य पेरण्यामागील उद्देश कृषिप्रधान देशाची ओळख जपणं आणि ते सर्वांच्या मनावर बिंबवणं हाच आहे. खेरीज शेती व्यवसायाचं प्राधान्य जाणवून देण्याचा आणि जपण्याचा उद्देशही यातून प्रतित होतो. शेती हाच मानवी अस्तित्वाचा मुख्य आधार असल्याचा हा विचार या उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक संकल्पनेत बांधला गेल्याचा अर्थ आपल्याला काढता येईल.

जाती आणि उतरंडींमधून विषमता जन्म घेते. पण या पुरुषप्रधानतेमुळेच बायकांमध्ये आणखी काही जाती जन्मल्या ज्या विवाहावरुन ठरवल्या जाऊ लागल्या. म्हणजेच ती विवाहित आहे का, तिचा पती जिवंत आहे का, तिला पतीने टाकली आहे का (जणू टाकून द्यायला ती एखादी वस्तू आहे) हे पाहून तिचं समाजातलं स्थान अथवा पत ठरु लागली. इथे सर्वात खालच्या थरावर राहिल्या त्या वेश्या. समाजाच्या दृष्टीने तर त्या कुलटाच! खरं तर तिच्याकडे जातो तो त्याच समाजातला पुरुष. पण पुरुषप्रधान व्यवस्थेने अशा पुरुषाच्या स्थानाला धक्का लागू दिला नाही आणि बाईला मात्र दुय्यम स्थान देण्याची एकही संधी सोडली नाही. हा पूर्वेतिहास लक्षात घेता सध्याच्या काहिशा निवांत काळात नवरात्र साजरं करताना प्रत्येक स्त्रीने बारकाईने विचार करावा आणि आधुनिकता आणि नवता यांचा संगम साधण्याचा संकल्प सोडावा. उदाहरणार्थ नऊ दिवसांमध्ये केवळ सवाष्णीची ओटी न भरता विधवेलादेखील तो मान द्यावा. घटस्फोटित, परित्यक्तांनाही त्यापासून वंचित ठेवू नये. कारण ओटी भरण्याच्या साध्या कृतीतूनही बाईचं बाईशी असणारं नातं दृढ होतं, ऋणानुबंध जुळतात आणि दोघींमध्ये मैत्र जुळतं. म्हणूनच ओटी भरण्यासाठी अन्य कोणत्याही निकषांपेक्षा बाईचं बाईपण महत्त्वाचं समजावं. या एका साध्या बदलामुळेदेखील एका सकारात्मकतेला चालना मिळेल आणि बायका- बायकांमधलं वैमनस्य संपण्यास हातभार लागेल.

आजची स्त्री कमावती आहे. ती स्वतंत्र नाही पण स्वावलंबी तरी आहे. पण आजही आपल्या पैशांवर तिचा अधिकार नाही. दुसरं म्हणजे ती ऑफिस आणि घरकामात इतकी अडकली आहे की एखाद्या पतीने पत्नीला तिच्या पैशाच्या आर्थिक नियोजनाबद्दल विचारलं तरी ती सगळी जबाबदारी पतीवर टाकून मोकळी होते. हे करताना आपल्याला अर्थनियोजनातलं काही कळत नाही, असा न्यूनगंड तिच्या मनात असतो कारण कामाच्या धबडग्यात ते समजून घेण्याइतका वेळ तिच्याकडे नसतो. त्यामुळेच आपण घरातली सगळी कामं सांभाळत असताना ‘डिव्हिजन ऑफ लेबर’च्या नियमानुसार ही बाहेरची कामं तुम्ही करा आणि त्यातही माझ्या हिताचा विचार ठेवा हे आता तिनं पतीला विश्वासानं सांगायला हवं. कारण एखादा पुरुष पोळ्या करता येत नाही म्हणून न्यूनगंड बाळगून बसत नाही. पण स्त्री मात्र छोट्या छोट्या बाबींबद्दल न्यूनगंड बाळगून कुढत बसते. आदिशक्तीपुढे हात जोडताना स्त्रीने आता या न्यूनगंडातून अथवा भयगंडातून बाहेर येण्याचा प्रयत्नही करायला हवा.

बदलत्या काळात योनिशूचितेबरोबर लिंगशूचिता हा शब्दही परिचित करुन घ्यायला हवा. कारण निकोप सहजीवनासाठी या दोन्ही बाजूंनी सामोपचाराचा विचार करणं गरजेचं आहे. आता समाजाने पावित्र्याच्या पुरुषप्रधान कल्पनांमधून बाहेर यायला हवं. कारण एखादी स्त्री पवित्र आहे की नाही, याविषयी चर्चा होते तशी एखाद्या पुरुषाबद्दल कधीच होत नाही. इथे नकळत पुरुष आहे म्हणजे तो पवित्रच आहे असं आपण गृहितच धरतो. मग याच गैरसमजातून, आत्मप्रौढीतून, चुकीच्या आत्मगौरवातून अनेक ठिकाणी निर्भया कांड घडतात. चुकीच्या कल्पनांमध्ये वाढवलेल्या मुलांचं बघता बघता पशूवत पुरुषांमध्ये रुपांतर होतं. म्हणूनच स्त्रीनेच आता आपल्या स्त्रीत्वाचा गौरव करावा, स्वत:च्या हक्काप्रती आग्रही रहावं, स्वत:च्या मतांवर ठाम रहावं. हीदेखील एक प्रकारची आदिशक्तीची पूजाच ठरेल. कारण नवरात्रीत आपण पूजतो ती देवी समर्थ आहे, ती एकल शक्ती (सिंगल वूमन) आहे. हे जाणून तिची पूजा करताना बाईच्या मनातही आपल्या मातृत्वाचा, स्त्रीत्वाचा अभिमान जागृत व्हायला हवा. मातृदेवतांनंतर आलेल्या संक्रमणकाळातल्या पुराणकथांमध्ये पुढे सगळे देव पुरुष आले हे समजून घ्यायला हवं. काही पुराणकथांमध्ये पुरुषांनी स्त्रियांवर अतिप्रसंग करण्याचे प्रकार आहेत, हेही डोळसपणे बघायला हवं. कारण त्याचंच प्रतिबिंब पुरुषी अहंकाराच्या रुपाने आज समाजात दिसत आहे. थोडक्यात, उत्सवाच्या निमित्ताने वाचल्या जाणाऱ्या पुराणांकडे नव्या डोळस दृष्टीने बघण्याची वेळ आता आली आहे हे बायकांनी समजून घ्यावं.

नवरात्रीच्या निमित्ताने देवीजवळ मुलासाठी नवस बोलण्यासारखे प्रकार आता थांबवायला हवेत. यापेक्षा देवीच्या रुपातलं सौंदर्य, त्या शक्तीतली सर्जनशीलता, ऋजुता, सौहार्दता जोपासायला हवी. कारण शेवटी महिलाच संस्कृतीच्या वाहक असतात...


(लेखिका साहित्यिक आहेत.)