बिहार : लोजपाचे ‘पासवानी’ राजकारण

प्रासंगिक

Story: शांताराम वाघ ९६२३४५२५५३ |
11th October 2020, 11:31 am

बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा अलीकडेच निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे तेथील गावागावात राजकीय वारे वहात आहे. तेथे नितीशकुमार हे जेडीयूचे नेतृत्व करत आहेत. गेली सुमारे १५ वर्षे ते मुख्यमंत्री या नात्याने काम करीत आहेत. अगोदर ते लालूप्रसाद यादव यांच्या जेडीयूबरोबर होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करून सत्ता राखली. आजही भाजपा बिहारमध्ये एकट्याच्या बळावर सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहू शकत नाही. त्यांना नीतीशकुमार यांच्या जेडीयूची मदत लागणार आहेच. 

बिहारमध्ये आजपर्यंत रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती, जेडीयू व भाजपा यांची आघाडी व अर्थात सत्ता आहे. आजारी असल्याने रामविलास इस्पितळात उपचार घेत होते. गेल्या गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता सारी सूत्रे त्यांचे पुत्र, अभिनेते, खासदार चिराग यांच्या हातात पूर्णतः आली आहेत. गेले काही दिवस चिराग व नितीशकुमार यांचे मतभेद शिगेला पोहचले होते. त्यामुळे हा पक्ष निवडणुकीत बिहारमध्ये जेडीयूची साथ सोडेल असा अंदाज होता. तो आता खरा ठरला आहे. निवडणुका घोषित होताच पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने जेडीयूबरोबर फारकत घेतली. अर्थात भाजपाबरोबर त्यांनी आपले संबंध कायम ठेवले आहेत. चिराग यांनी आपण एनडीएबरोबर आहोत व भाजपाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. पण, त्याचबरोबर एनडीएचे सदस्य असलेल्या जेडीयूला आपला विरोध राहणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभे  करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. 

इकडे भाजपा व जेडीयू यांच्यातील जागेचा तिढा सुटला असून २४३ जागेच्या विधानसभेसाठी जेडीयू १२२ तर भाजपा १२१ जागा लढविणार असल्याचे घोषित झाले आहे. जेडीयू आपल्या कोट्यातून जीतनराम माझी यांच्या पक्षाला पाच ते सात जागा देतील. इकडे चिराग यांनी भाजपाविरुद्ध उमेदवार उभे करणार नसल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ भाजपाविरुद्ध चिराग प्रचार करणार नाहीत. पण, भाजपचे जोडीदार जेडीयू विरोधात उमदेवार उभा करणार असून विरुद्ध प्रचारही करणार आहेत. (रामविलास यांच्या निधनामुळे लोकपाला सहानुभूती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.) यामुळे काही ठिकाणी भाजपलाही उमेदवारांबद्दल पुनर्विचार करणे भाग पडले आहे. इथे पंचाईत होणार ती भाजपाची. कारण त्यांना आघाडीत असल्यामुळे जेडीयूचा प्रचार करावा लागणार.

चिराग यांनी निवडणुकीनंतर भाजपाबरॊबर जाणार असल्याचे सांगितले आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या विरोधात वातावरण असल्याचा वास लोजपाला आला आहे. त्याचबरोबर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला स्थान मिळावे या दृष्टीने तो प्रयत्नही करत आहे. आतापर्यंत कमी आमदार असूनही पासवान कुटुंब सत्तेत राहिले आहेत.

गेल्या काही वर्षांतील निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिली असता लोकजनशक्तीची ताकत मर्यादित आहे, हे दिसते. २००५ मध्ये भाकपबरोबर युती करून त्यांना १० जागा मिळाल्या होत्या व मते १२.६१ टक्के मिळाली होती. २०१० मध्ये राजद- जेडीयूबरोबर युती करून ३ जागा मिळाल्या होत्या व मते ६.७४ टक्के  मिळाली होती. २०१५ मध्ये भाजपाबरोबर युती करून दोन जागा मिळाल्या होत्या व मतांची टक्केवारी ४.८० टक्के होती. अपवाद गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा. त्यावेळा त्यांनी लढविलेल्या सहाही जागा जिंकल्या होत्या. अर्थात मोदी फॅक्टर त्यावेळी कामास आला होता. सर्वसाधारणपणे विचार करता लोजपाची ताकद फार मोठे आव्हान देईल, असे आत्ता तरी वाटत नाही. पण, बिहारमधील आरोग्य व्यवस्था व मजुरांच्या स्थलांतरीत प्रश्नावर ते निवडणूक प्रचारात आवाज उठवू शकतात. त्यामुळे नितीश कुमार यांच्या पुढे हे मोठे आव्हान आहे.

लालूप्रसाद यांच्या विरोधी आघाडीत एकवाक्यता झाली असून तेजस्वी प्रसाद यांच्या नेतृत्वखाली ते जेडीयू व भाजपाशी सामना करतील. त्यांच्या आघाडीत त्यांचा स्वतःचा राजद पक्ष तसेच काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षांचा तसेच इतर काही लहान पक्षांचा समावेश आहे. काँग्रेस ७० जागांवर समाधानी झाली आहे. सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशीमध्ये डोंगर पोखरून उंदीर निघाल्याने तसेच बिहारमधील आरोग्य व्यवस्था व मजुरांचे स्थलांतरण या प्रश्नांवर ते सत्तारूढ आघाडीला पेचात पकडू शकतात. या आघाडीने तेजस्वी प्रसाद यांना मुख्यमंत्री म्हणूनही घोषित केले आहे. आज तरी जेडीयू व भाजपाचे पारडे जड दिसते, पण निवडणुकीत काहीही सांगता येत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज द्यावी लागणार, हे नक्की.


(लेखक निवृत्त कर्मचारी आहेत.)