शेवटी पात्रांव कोण?

इतस्ततः

Story: सुधीर तेलंग [email protected] |
11th October 2020, 11:31 am

आज सकाळपासून साहेबांचं बिनसलं होतं. शरीराचा प्रत्येक अवयव भांडल्यासारखा दुखत होता. शेवटी क्वार्टर +६०

घेऊनच झोपले. पण, आतमध्धे गोंधळ, मारामारी चालली होती. प्रत्येक अवयव मीच पात्रांव (बाॅस) म्हणून भांडत होता. 

हात बोलला, माझ्याशिवाय तुमच्यापाशी दुसरा पर्याय नाही. लिहिणे, खाणे, धुणे, प्रेयसीचा हात पकडणे, कानाखाली वाजविणे वगैरे किती मोठी मोठी व इम्पाॅर्टंट कामं करतो मी. तेव्हा मीच पात्रांव आहे.

पाय बोलला, अरे ए शाण्या, मी तुला चालत घेऊन गेल्यानंतरच ही कामे करशील ना?

हात म्हणाला, ते तर तू कॅरियरचं काम करतोस. त्यांत काय मोठं? माझ्यावर कित्ती कित्ती गाणी, सिनेमा काढले गेले. "हात तुझा हातात मंद ही हवा", "हाथ की सफाई". प्रणयाराधन करण्यात मीच पुढे. तुला "तंगडी धरुन, कोंबडी पळाली" याशिवाय ‌काय येतं?

पाय बोलला, मला काय येतं दाखवू? पेकाटात एक लाथ मिळाल्यावर कळेलच. 

हे सगळे ऐकून पोट म्हणालं, "अरे बैलांनो, तुम्ही ‌नोकर आहात. माझ्याकडे आलेल्या अन्नाला शुद्ध करुन तुमच्यात खेळवतो म्हणून तर तुम्ही कामं करु शकता". हे ऐकताच तिथून किडन्या कडाडल्या, "अरे ए पोटोबा, आठव जरा. या मोठ्या टाऊनशिपमध्ये आम्ही, जठर, लिव्हर वगैरेंनी प्लाॅट घेऊन बंगले बांधले. भरपूर लुटून तुला आता चरबी येऊन ढेरपोट्या झाला आहेस. तेव्हा आम्हाला चॅलेंज करू नकोस".

इतक्यात वरून "धक धक" आवाज आला. हार्ट बोंबलत होतं. "मी रात्रंदिवस धडधडत असतो, म्हणून तर तुम्ही आहात. माझ्या पाईपलाईनींच्या जाळ्यातून मी तुम्हाला रक्तपुरवठा करीतच असतो. मीच बाॅस तुमचा".

सगळे एका स्वरात ओरडले, "चूप रे, तुझ्या सारखा किटकिटी व खर्चिक दुसरा कुणी नसेल. हे खाऊ नको, ते खाऊ नको, कोलेस्ट्रॉल वाढेल. ऊठसूठ डाॅक्टरकडे बीपीसाठी फेऱ्या! आणि ते बाॅलीवूड वेडे, "दिल एक   मंदिर..." घंटा. दिल धडका"! मग डोकं आपटा. "धक धक करने लगा", तिथे माधुरी बदनाम! असे कितीतरी

"हृदयस्पर्शी" किस्से आहेत. फुकट टाईम वेस्ट. हृदयाने तिथून आपला व्हाॅल्व घेऊन पळ काढला.

मग फुस्स फुस्स करून फुप्फुस आले. सगळे म्हणाले, "साला करोना पुढे पोकळ होतो, आला मोठ्ठा बाॅस, लाज नाही वाटत"?

असे एका मागून एक आपापली महती सांगून "बाॅसशीप" पटकवायला आले, पण कुणाचीही एकमताने निवड

झाली नाही. सगळे व्याधीग्रस्त निघाले. आजकाल नजर घाणेरडी म्हणून डोळ्यांचा निकाल लागला, वरून "डोळे हे जुल्मी गडे" ऐकून ‌घ्यावे लागले. नाकुटली काही बोलण्याआधीच एका शिंकेत आऊट झाली. वरून "नकटीच्या लग्नाला विघ्नं फार" हा शेरा ऐकवला गेला.

संजय राऊतच नाव घेऊन तोंडावर यथेच्छ तोंडसुख घेऊन तोंडघशी पाडण्यात आले. कानफुंका अशी "शोले" मध्येकेश्तोची बदनामी झाल्यामुळे कान आउट झाला. इतक्यात वरून आकाशवाणी झाली. मोठ्या आवाजात मेंदू ओरडला, "मी बिग बाॅस बोलतोय, चूप बसा! बिलकूल आवाज नहीं मंगता. मी तुमचे सगळे संभाषण ऐकत होतो, बरेच मनोरंजन झाले. तुमच्या सगळ्यांचा कन्ट्रोल माझ्याकडे आहे. फक्त माझं ऐकायचं".

इतक्यात सर्वांत मागून "ढूम-ठो" असा आवाज आला. मागून पार्श्वभाग डुलत, लचकत, मुरडत येत होता. सगळे

ओरडले, "ढुंगण्या, तुला कुणी एंट्री दिली? तुला रोज सकाळी टॅंक खाली करायचं काम दिलं आहे ना? आज ते पण काम नीट केलं नाहीस‌!" 

पार्श्वभाग म्हणाला, "तुम्ही वाटेल ते अरबट चरबट जंक जिन्नस खाता आणि पचले नाही, गॅस झाला तर मला कशाला दोष देता?"

पोट म्हणाले, "काम करीत नाहीस, वरून उलटी उत्तरं देतोस? घाला रे त्याला एक लाथ." खिन्न होऊन पार्श्वभाग निघून जातो व ठरवतो या सर्वांना धडा शिकवलाच पाहिजे. तो जातो व खालच्या ड्रेनेज पाईपला मोठ्ठे बूच मारतो. "आता बोंबला!"

दोन- तीन दिवसांतच शरीराची हालत खराब होते. हातपाय लुळे पडू लागतात, गॅस होऊन पोट फुलते. जठर, किडन्या डगमगतात, रक्ताचे हायवे, रस्ते, सगळीकडे ट्रॅफिक जॅम. तोंडपट्टा बंद, नाकाला नाकदुऱ्या आल्या, श्वास कमी झाल्यामुळे फुप्फुसे पोकळ झाली, हृदयाचे ठोके चुकायला लागले. मेंदू भ्रमिष्ट अवस्थेत गेला, मेडिकल इमर्जंसी जाहीर झाली, मग मात्र सगळे अवयव गडबडले, सैरभैर झाले. सगळ्यांना कळून चुकले की ढुंगण्याचा

अपमान करायला नको होता. सगळे अवयव हात जोडून पाया पडले.

"आजपासून तूच बिग बाॅस, पण प्लीज ते बूच काढ व टॅंक खाली कर". ढुंगण्या बोलला, "ठिक आहे". बाथरूम मध्ये जाऊन टॅंक रिकामा केला. इतक्यात साहेबांना तिरमिरून जाग आली. पोट सावरीत तडक त्यांनी स्वत:ला टॉयलेटमध्ये झोकून दिले.


तात्पर्य : मेंदूच बाॅस होईल असं काही नाही, ढुंगण्यासुद्धा बाॅस होऊ शकतो.