वाढत्या मानसिक आजारांना आपणच जबाबदार

संवेदना

Story: डॉ. प्रितम भि. गेडाम ८२३७४ १७०४१ |
11th October 2020, 11:29 am
वाढत्या मानसिक आजारांना आपणच जबाबदार

जागतिक मानसिक आरोग्य दिन कालच पाळण्यात आला. आज स्त्रिया व वृद्धांवरील वाढते अत्याचार, स्वार्थ, प्रदूषित वातावरण, आवाज, नशा, फसवणूक, अपमानास्पद शब्द किंवा वर्तन, इतरांकडून अती अपेक्षा, वाढती जबाबदारी, संस्कारांची कमतरता, एकटेपणा, दुःखद आठवणी, सहानुभूतीचा अभाव, निराशा, अपयश, परिस्थितीला घाबरून जाणे, रात्री उशिरापर्यंत जागणे, पौष्टिक व संतुलित आहाराची कमतरता, कुटुंबात समजूतदार मार्गदर्शकांचा अभाव, भवितव्याची काळजी अशा गोष्टी माणसाला मानसिक आजार देतात. सहनशक्तीच्या अभावामुळे मनुष्य पटकन संयम गमावतो, भारतीय मनोविकृती संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे की लॉकडाऊननंतर मानसिक रोगांच्या बाबतीत वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे, ज्यामध्ये दर पाच भारतीयांपैकी एक जण त्रस्त आहे.

सर्वात मोठा शत्रू आपण स्वतःच आहोत. आपण लहान समस्यादेखील गंभीर स्वरुपात बघतो. समस्या कशी सुटेल? काय करायचं? लोक मनाच्या मनामध्ये हजारो गोंधळ निर्माण करून स्वतःलाच गुंतून घेतात. त्यामुळेच व्यक्ती आतून संकुचित होत जाते, मग नकारात्मक विचार मनात रुजतात. आज समाजात असंख्य समस्या आहेत आणि त्यात आपलाही छोटासा सहभाग आहे. आम्हाला अडचणींची कारणे आधीच माहीत असतात, तरीही आपण जे करू नये तेच मुद्दाम करतो. मादक पदार्थ हानिकारक आहेत हे जाणून देखील, लोक स्वतःहून व्यसनाचा आहारी जातात. फक्त जिभेच्या चवीसाठी, बाहेरचे नको ते खातात. अर्थात शारीरिक, मानसिक रोगांचे मूळ आपणच तयार करतो.

मानवी सुरक्षा सुविधेसाठी नियम कायदे आहेत, परंतु लोक स्वतः नियम मोडतात. जवळचा लोकांना विसरून सोशल मीडियाची सवय लावून तिथे मित्र शोधतात, अमुल्य वेळ घालवितात, तणावग्रस्त वातावरणात जगतात, व्यायाम करायला कंटाळा करतात. कंटाळवाण्या, नकारात्मक, आक्रस्ताळ्या आणि रडक्या टीव्ही मालिका, बातम्यांपासून दूर रहावे. कारण आपण ज्या प्रकारे पाहता, ऐकता, विचार करता, त्याचा परिणाम मनावर पडतो आणि तेच आपल्या व्यवहारातही उतरत असते. नेहमी निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करावे. खरेदी किंवा व्यवहार करताना जागरूक रहा, आकर्षण आणि आवश्यकतेमधील फरक समजून घ्या. आपले कुटुंब, समाज, देश यांच्याबद्दलची आपली जबाबदारी समजून घ्या. मुलांना चांगले संस्कार देत नाहीत आणि जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा पालक पश्चात्ताप करतात व इतरांना दोष देतात. आपली मुले मोठी होऊन देश आणि मानवजातीच्या विकासाचा आधार बनावीत, गुन्हे करून माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य करणारी व्हायला नकोत, ही जबाबदारी पालकांची आहे. 

एक चुकीचा निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकतो. नेहमी निर्णय घेण्यापूर्वी, संबंधित सर्व बाबींकडे लक्ष द्या, लोक काय करीत आहेत, त्याऐवजी, आपण काय करीत आहोत याचा विचार करा. कुजबुज करणारे आणि स्वार्थी लोकांपासून दूर रहा, लोकांना ओळखण्यास शिका. देखाव्याच्या जीवनशैलीपासून दूर रहा, तुमची विचारशक्ती वाढवा, काळाची मागणी समजून घ्या आणि त्यानुसार स्वतःला बदला.

चांगल्या आरोग्यासाठी स्वतःकरीता वेळ काढायला हवा. चांगले आरोग्य हा जीवनातील यशाचा आधार असतो. स्वतः समाधानी, संतुष्ट रहा, सकारात्मकतेला प्रोत्साहन देणारे मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी नेहमीच चांगले संबंध ठेवा. सकारात्मक आणि आशावादी दृष्टी आपल्याला मानसिकदृष्ट्या निरोगी करते. चांगले आणि आनंदी वाटणे, इतरांचा द्वेष किंवा हेवा न वाटणे हे मानसिक आरोग्य सुदृढ असण्याचे लक्षण आहे. तरीही जेव्हा आपण इतरांवर रागावतो तेव्हा त्याचा वाईट परिणाम आपल्याच शरीरावर, मनावर होतो. स्वतः हसणे, आपल्या आजूबाजूचा लोकांना हसवणे आणि वातावरण आनंदी ठेवणे, इतरांचा सन्मान करणे आणि सगळ्यांशी अत्यंत सभ्यपणे वागणे हे सर्व आपल्याला निरोगी बनविते. त्याचप्रमाणे, नैसर्गिक वातावरण हा आरोग्याचा एक प्रमुख पाया आहे.

निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी पाच नियमांचे अनुसरण करायला हवे.

व्यायाम :- आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम हा नित्याचा भाग असावा. शारीरिक आरोग्यदेखील आपल्याला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्यायाम, मग तो योग असो, जिम, खेळ, पायी चालणे, पाळीव प्राण्यांसोबत खेळणे, सायकल चालवणे किंवा कोणताही शारीरिक श्रम करणारा व्यायाम असो तो करायलाच पाहिजे. ध्यान केल्याने सुद्धा आरोग्याची पातळी सुधारते, यामुळे आपले मन शांत होते. आपण जितकी कॅलरी घेतोय, तितकी खर्च करायला हवी, म्हणजे शरीरात अन्नाचे योग्य पचनकार्य आवश्यक आहे.

पौष्टिक आहार :- शरीराला आणि मनाला योग्य क्षमतेने कार्य करण्यासाठी आणि ऊर्जेसाठी आपल्याला एक चांगला पौष्टिक आहार हवा असतो. कारण हा आहार आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो. आहारात समाविष्ट पाच मुख्य पोषक घटक - कर्ब, प्रथिने, वसा, खनिज लवण आणि जीवनसत्त्वे वेगवेगळ्या पातळीवर, शारीरिक ताकदीसोबत मानवी भावना, मनःस्थिती नियंत्रित आणि मानसिक समतोल राखण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका निभावतात. याव्यतिरिक्त, उदासीनता, ताणतणाव, चिंता, अल्झायमर यासारख्या प्रमुख मानसिक आजारांवर आहार, योग्य पौष्टिक पूरक आहार (न्यूट्रिशन सप्लीमेंट) सारख्या पद्धतीने उपचार करण्यास मदत होते.


संपूर्ण झोप :- प्रत्येक व्यक्तीला किमान आठ तास झोप मिळणे फार महत्वाचे आहे. अशी निश्चिंत झोप दररोज शरीराला आणि मेंदुला चार्ज करण्यासाठी आवश्यक आहे. तज्ञांचा विश्वास आहे की योग्य वेळी झोपेची योग्य मात्रा न मिळाल्यास शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण असमतोल होतात. ते डोकेदुखी, औदासिन्य, चिंता आणि चिडचिडेपणाचे कारण बनतात. झोप न लागल्याने मानसिक आणि शारीरिक ताणतणाव वाढतो. रोगप्रतिकारक प्रतिक्रिया बदलू लागते. याचा परिणाम शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळीवर होतो. ज्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. आपल्या झोपेची वेळ ठरवा, दररोज त्याच वेळी झोपायला जा, आणि ही सवय बनवा. इलेक्ट्रॉनिक संसाधनाचा वापर कमी किंवा आवश्यक तरच करावा. निसर्गाशी जवळीक करावी. आज मोबाइल इंटरनेट, सोशल मिडियाच्या व्यसनाने लाखो लोकांना झोपेचा त्रास होत आहे.


दिखाव्यांपासून दूर रहा :- आपल्या समाजात, दिखावा ही अशी फॅशन बनली आहे. स्वतःला सर्वश्रेष्ठ बनवण्याचा नादात दररोज अनेकांचे जीवन उध्वस्त होत आहे. जग आपल्याबद्दल काय म्हणेल, ही भावना मनात बाळगून ते दिखावा करतात, मनाला मारून जे आवडत नाही ते काम करतात. खोटे बोलतात, नकारात्मक विचार करतात. लोक आतून एक आणि बाहेरून दुसरे असतात, अशे लोक वेळेनुसार बदल सहन करत नाहीत, भीतीच्या दडपणात वावरतात. चिंतेने चुकीचे निर्णय घेतात किंवा आपले जीवन नष्ट करतात. त्यांच्याजवळ संकटकाळी कोणीही नसते. मनुष्याने नेहमीच साधे जीवन जगले पाहिजे, म्हणजेच आपण वेळ व आवश्यकतेनुसार कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी लोक जवळीक करण्याचा प्रयत्न करतात, पण चांगले लोक तुमच्या कार्यावर, वागणुकीवर, स्वभावावर प्रभावित होतात आणि तुमचे आपले बनतात. तेव्हा जगाला तुम्ही जसे आहात तसेच दर्शवावे.


सामाजिक कार्य :- मनुष्य म्हणून जन्मला, तर माणूस म्हणून जगा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला परोपकाराची भावना असावी. जीवन असे जगावे की आपल्यामुळे इतरांना कधीही त्रास होऊ नये. दररोज एक तरी काम आपण समाज, असहाय्य लोक, पर्यावरण, प्राणी आणि पक्ष्यांसाठी निःस्वार्थपणे केलेच पाहिजे. अर्थातच आपण इतरांकरीताही जगणे शिकले पाहिजे, जेणेकरुन आपल्याला माणुसकी म्हणून दुसऱ्यांचा कामी येण्याचे समाधान मिळेल. अशा कामाने अमर्याद शांती प्राप्त होते, जी तुम्हाला पैसे खर्च करूनही मिळू शकत नाही. तणावमुक्त जीवन जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

जर आपण या नियमांचे सतत पालन केले तर नेहमी आनंदी, निरोगी, सकारात्मक उर्जेने भरलेले असाल. आपण इतर लोकांपेक्षा अधिक सक्षम व्हाल, आत्मविश्वास वाढेल आणि आजारांपासून दूर रहाल. कठीण काळात कधीही हार मानू नका, प्रयत्न करणे हे काम आहे. जर समस्या असेल तर वेळ देखील सतत बदलत असते. त्याच प्रकारे परिस्थिती कधीही एकसारखी नसते. माणसाच्या आत असलेली भीतीच माणसाला कमकुवत बनवते. माणसाला फक्त वाईट कृत्ये करण्यास घाबरायला पाहिजे. लोक काय म्हणतील ते विसरून जावे. कारण हे लोक आपल्या समस्या सोडवायला, गरजा पूर्ण करण्यासाठी येत नाहीत. म्हणून चांगली कामे लहान किंवा मोठी, आयुष्यात कधीच करायला लाज वाटू नये. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा, नेहमी हसत- खेळत, सकारात्मक आणि तणावमुक्त रहा.

(लेखक मानसिक विषयाचे तज्ञ आहेत.)