स्वयंपूर्णतेसाठी सरकारी अधिकार्‍यांना बनवणार ‘कर्मयोगी’!

मुख्यमंत्र्यांचा निर्धार; प्रशिक्षण देऊन गांधी जयंतीपासून उतरवणार मैदानात


23rd September 2020, 10:17 pm
स्वयंपूर्णतेसाठी सरकारी अधिकार्‍यांना बनवणार ‘कर्मयोगी’!

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : स्वंयपूर्ण गोव्यासाठी मंत्री, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींप्रमाणेच सरकारी अधिकारी, कर्मचारी यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाप्रमाणे राज्यातील सरकारी अधिकार्‍यांना ‘कर्मयोगी’ बनवून त्यांना ग्रामीण गोव्याच्या विकास मोहिमेत उतरविण्याचा चंग मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बांधला आहे. तशी घोषणाही त्यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.

‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेअंतर्गत गोव्याला सर्वच क्षेत्रांमध्ये स्वयंपूर्ण बनविण्याच्या कामास सरकारने सुरुवात केली आहे. याचे प्रत्यक्ष काम गांधी जयंतीपासून (२ ऑक्टोबर) सुरू होणार आहे. उच्च शिक्षण संचालनालय तसेच जिपार्डने केलेल्या सर्वेच्या आधारे स्वयंपूर्ण गोव्याबाबत तयार केलेल्या कामांचे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, एकमताने पुढे जाण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागांना बळकटी देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागांतील लोकांना कृषी, पशुपालन, स्वयंरोजगार, उद्योगधंदे आदींसारख्या क्षेत्रांत पुढे आणून प्रोत्साहन देण्याचे मुख्य काम राज्यातील सरकारी अधिकार्‍यांकडे असणार आहे. त्यादृष्टीने सुमारे अठरा सरकारी खात्यांच्या अधिकार्‍यांना त्याबाबतचे प्रशिक्षण दिले असून, इतर खात्यांच्या अधिकार्‍यांनाही लवकरच प्रशिक्षण देण्यात येईल,

असे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून गोवा विविध जीवनावश्यक वस्तूंसाठी शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक तसेच मध्य प्रदेशसारख्या विविध राज्यांवर अवलंबून आहे. त्याचा फटका करोनाकाळात स्थानिकांना भोगावा लागला. भविष्यात अशा गोष्टींची राज्यात टंचाई जाणवू नये, यासाठी स्थानिक शेतकरी, उद्योजक, व्यावसायिकांनी गोमंतकीयांसाठी लागणार्‍या वस्तू राज्यातच तयार कराव्या. शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्नात वाढ करून त्यावर आधारित जोडधंदे सुरू करावे. यासाठीच सरकारने स्वयंपूर्ण गोव्याची मोहीम हाती घेतली असून, मोहिमेत सहभागी होणार्‍या प्रत्येकाला सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुक्तीच्या साठीनिमित्त वर्षभर कार्यक्रम

१९ डिसेंबर २०२० रोजी गोवा मुक्तीस ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुढील वर्षभर स्वयंपूर्णतेचे विविध कार्यक्रम राबवून आणि गोमंतकीयांना त्यात सहभागी करून घेऊन प्रगतीचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. या मोहिमेत सर्वच गोमंतकीयांनी सरकारला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


हेही वाचा