आणखी आठ बळी; नवे ५३६ करोनाबाधित

३९५ जण करोनातून मुक्त; सक्रिय बाधितांची संख्या ५,६४६


23rd September 2020, 10:15 pm
आणखी आठ बळी; नवे ५३६ करोनाबाधित

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : चोवीस तासांत राज्यातील आणखी आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची संख्या ३७६ झाली आहे. नवे ५३६ बाधित आढळले असून, ३९५ जण करोनातून मुक्त झाले आहेत. राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या ५,६४६ झाली आहे.

जुने गोवे येथील ७५ वर्षीय महिला, हळदोणे येथील ७७ वर्षीय पुरुष, चोडण येथील ७४ वर्षीय पुरुष, फोंडा येथील ४९ वर्षीय पुरुष, वास्को येथील ८१ वर्षीय पुरुष, वास्को येथील ७६ वर्षीय महिला, आके येथील ५० वर्षीय पुरुष व मालभाट येथील ५५ वर्षीय महिलेचे करोनामुळे निधन झाले. आठपैकी पाच जणांचा गोमेकॉत, तर दोघांचा मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आठही मृत व्यक्तींना इतर गंभीर आजारही होते, अशी माहिती आरोग्य खात्याने अहवालातून दिली आहे.

पणजीत २४ तासांत तब्बल ४२ नवे करोनाबाधित आढळले आहेत. पणजीतील सक्रिय बाधितांची संख्या ३१९ झाली आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली आहे.

सेंटर्समधील ७९० खाटा रिकाम्याच

लक्षणे नसलेले बहुतांशी रुग्ण कोविड केअर सेंटरऐवजी घरीच अलगीकरणात राहण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमधील ५४५ पैकी २५७ आणि दक्षिण गोव्यातील कोविड केअर सेंटरमधील १,००६ पैकी ५३३ खाटा रिकाम्या आहेत.


हेही वाचा