कार्यतत्पर जनसेवक

गोव्याच्या राजकारणातील एक अजातशत्रू, लोकप्रिय नेता म्हणून विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांची स्वतंत्र ओळख आहे. प्रत्येकाशी आपुलकीचे नाते जपणे, सुख-दुःखात सहभागी होणे, गरजवंताच्या मदतीसाठी पुढाकार घेणे या गुणांसह मृदुस्वभावी असे हे व्यक्तिमत्व नेहमीच आदर्शवत ठरले आहे. आज त्यांचा वाढदिन. त्यानिमित्त त्यांच्या वाटचालीचा थोडक्यात घेतलेला आढावा.


23rd September 2020, 02:02 am
कार्यतत्पर जनसेवक

राजेश पाटणेकर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९६३ सालचा. युवा असतानाच सेवाभाव जपत त्यांनी नेतृत्व गुण विकसित केले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी नेते व इतर पदे त्यांनी भूषवली. उत्तम क्रिकेट खेळाडू, उत्तम गायक  असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून युवा दशेपासून त्यांनी अनेक गौरव प्राप्त केले. सेवाभाव जपत गरजवंतांच्या मदतीला  धावणे आदी गुणांसह युवकांना एकत्र करून विविध संस्था स्थापन करून त्यांनी लोकप्रियता वाढवली. 

 डिचोली पालिका निवडणुकीत वॉर्ड नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यानंतर २००२ साली भाजपच्या उमेदवारीवर ते आमदार झाले. 

आमदार म्हणून प्रभावी 

पुन्हा २००७ साली आमदार झाले. या दरम्यान त्यांची लोकप्रियता वाढत गेली. प्रत्येक घरात परिचित असलेला हा नेता जनसेवा करत राहिला.  कोणत्याही प्रकारचा मोठेपणा न बाळगता राजेश यांनी डिचोली मतदारसंघात सेवाभाव जपला. आपल्या मतदारसंघात गाजावाजा न करता अनेक विकासाच्या योजनांना चालना दिली.  

सभापती म्हणून यशस्वी 

२०१७च्या निवडणुकीत तिसर्‍यांदा आमदार बनलेले राजेश पाटणेकर यांनी विधानसभा सभापती होण्याचा मान मिळाला. आज गोवा विधानसभेचे सभापती म्हणून ते उत्तम सेवा बजावत आहेत. मतदारसंघात विकास करताना त्यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. आरोग्य, शिक्षण, कला-क्रीडा सामाजिक योजनांना चालना, मूलभूत व पायाभूत विकास व त्या जोडीला मानवी विकासाला चालना देताना त्यांनी अनेक दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात दिला आहे. 

सर्व घटकांना न्याय 

राजकारणाच्या माध्यमातून समाज सेवा करीत असताना त्यांनी सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. सत्ताधारी व विरोधक असा भेद त्यांनी कधीच केला नाही. प्रत्येक व्यक्तीला आपला नेता वाटावा, अशी पाटणेकर यांची खासियात आहे. करोनाच्या महामारीतही न डगमगता त्यांनी पाच महिने लोकांना धीर देत अनेक योजना मार्गी लावत सेवा केलीय.

बडेजाव पसंत नाही 

मतदारसंघात एक आदर्श नेता म्हणून जनता त्यांना खूप मानते. कोणताही बडेजाव त्यांना पसंत नाही. प्रत्येक घरात त्यांनी आदराचे स्थान मिळवले आहे. असा हा सेवाभावी नेता लोकप्रियतेच्या शिखरावर असला तरी त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. डिचोली मतदारसंघ रोल मॉडेल करणे हा आपला ध्यास आहे. आज आर्थिक संकट असले तरीही अनेक योजना पूर्ण होत आहेत. त्याचे समाधान असल्याचे ते सांगतात. 

विविध क्षेत्रांत योगदान 

पालिका व पंचायत विभागात त्यांचा राबता असतो. ते नियमित मतदारसंघात फिरत असतात. सुख-दुःखात सहभागी होऊन माणुसकीचे नाते वृद्धिंगत करत शिक्षण क्षेत्रातही विद्यावर्धक मंडळाच्या माध्यमातून त्यांचे मोठे कार्य सुरू आहे. सुमारे साडेतीन हजार मुले त्यांच्या संस्थेत शिक्षण घेत आहेत. डिचोलीत आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, वाचन संस्कृती, पायाभूत विकास योजना, महिला, युवा, बाल कल्याण आदी क्षेत्रांत त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. आज एक अनुभवी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. सभापती पद सांभाळताना ते सर्वच घटकांचा विचार करून निर्णय घेत असतात. अशा या लोकप्रिय नेत्याला वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

- परिचित