खासगी इस्पितळांच्या दरात घट

सरकारकडून घोषणा; तरीदेखील अन्य राज्यांच्या तुलनेत चढेच


23rd September 2020, 12:01 am
खासगी इस्पितळांच्या दरात घट

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : विरोधक आणि नागरिकांतून टीका झाल्यानंतर सरकारने करोना उपचारासाठीचे खासगी इस्पितळातील शुल्क काही प्रमाणात कमी केले आहेत. तरीदेखील अन्य राज्यांच्या तुलनेत हे दर अधिक असल्याने सरकार नागरिकांच्या डोळ्यांना पाने पुसत असल्याचे बोलले जात आहे.

नव्या दरानुसार सर्वसामान्य वॉर्डासाठी प्रतिदिन १० हजार, दोघांना रहाण्यासाठी प्रतिदिन १३ हजार, खासगी खोलीसाठी प्रतिदिन १६ हजार आणि व्हेंटिलेटरसह आयसीयूसाठी प्रतिदिन २४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. शुल्क कमी केले असले तरी ते महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली या राज्यांच्या तुलनेत कितीतरी पटीने चढच आहेत.

मागील आठवड्यात तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनंतर सरकारने करोना उपचारासाठी खासगी इस्पितळातील प्रतिदिनासाठीचे शुल्क निश्चित केले होते. सर्वसामान्य वॉर्डसाठी १२ हजार, दोघांना रहाण्यासाठी १५ हजार, खासगी रूमसाठी १८ हजार, व्हेंटिलेटरसह आयसीयूसाठी २५ हजार रुपये शुल्क जाहीर केले होते. एखादा रुग्ण सामान्य वॉर्डमध्ये १५ दिवस राहिला तर त्याला ३ ते ४ लाख रुपये खर्च येईल. हे दर सामान्यांना परवडणारे नाहीत, अशी टीका विरोधी पक्ष काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व मगोच्या नेत्यांनी केली होती. सामान्य नागरिकांतही या दरांबाबत नाराजी होती. याची दखल घेऊन सरकारने दराबाबत फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. खासगी हॉस्पिटलमधील शुल्कांची फाईल मुख्यमंत्र्यांकडे आहे. तेच यावर निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले होते. या दरांचा फेरविचार केला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. त्यानुसार दर कमी करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला.

डायनोस्टिक इन्टरवेंशन्स, हायफ्लो ऑक्सिजन आदी विशेष उपकरणांचा वापर किंवा शस्त्रक्रिया यांचे वेगळे शुल्क राहील, असे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. अ‍ॅडमिशन, खाट, डॉक्टर, कार्डियाक मॉनिटर, झिंक, विटामिन सी गोळ्या यांचा समावेश वरील शुल्कात आहे.

अन्य राज्यांतील दर तुलनेत कमी 

महाराष्ट्रात सामान्य वॉर्डसाठी प्रतिदिन ४ हजार, आयसीयू वार्डसाठी ७५००, तर आयसीयू आणि व्हेंटिलेटरसाठी ९ हजार रुपये शुल्क आहे. कर्नाटकात सामान्य वार्डसाठी प्रतिदिन ५२००, आयसीयू वॉर्डसाठी ८५००, तर आयसीयू आणि व्हेंटिलेटरसाठी १० हजार रुपये शुल्क आहे. दिल्लीत सामान्य वॉर्डसाठी प्रतिदिन ८ ते १० हजार, आयसीयू आणि व्हेंटिलेटरसाठी १५ ते १८ हजार रुपये शुल्क आहे.