तामीळनाडू गुन्ह्या‍तील २० जणांना कांदोळीत अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd September 2020, 11:31 pm



म्हापसा : तामिळनाडूमधील प्राणघातक हल्ला व घरफोडी प्रकरणातील २० संशयित आरोपींना कांदोळी येथे अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी हॉटेल व दोन अपार्टमेंटमध्ये लपून बसले होते. कळंगुट पोलिसांच्या सहाय्याने तामिळनाडू पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील बलूचेट्टी चतरम पोलिस स्थानकाच्या हद्दीत प्राणघातक व घरफोडीचा गुन्हा घडला होता. या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपी फरार झाले होते. ते गोव्यात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बलूचेट्टी चतरम पोलिस स्थानकाचे निरीक्षक नमी मानवा हे पोलिस पथकासह गोव्यात रवाना झाले होते. कांदोळी येथे एका हॉटेलमध्ये संशयित असल्याची माहिती मिळाल्यावर कळंगुट पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ, उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर व पोलिसांच्या मदतीने तामिळनाडू पोलिसांनी त्या हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलमध्ये लपलेल्या दिनेश कुमार, मनी मरन व मनीगाचन या तिघा संशयितांना अटक केली.
संशयितांच्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने दोन अपार्टमेन्टवर छापा टाकला व इतर सतरा संशयितांना अटक केली. गंडी डेव्हीड, विकेश रमेश, राजेश गणेशान, सेटबडी शल्लम, प्रशांत, गोपी, शैलेश कुमार, कार्तिक कुमार, अरुमुगम, साकेश, अरुण कुमार, तुलसीराम, राजा, अरुण, तेलराजन, सुरंदर, मनीगारडोन या संशयितांचा समावेश आहे. तामिळनाडू पोलिस सर्व संशयितांना घेऊन रवाना झाले आहेत.