कोलवा रस्त्याकडेला किरकोळ मासळी विक्रेत्यांना दंड

पोलिस प्रशासनाकडून तात्काळ कारवाईला सुरुवात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd September 2020, 11:30 pm

मडगाव : एसजीपीडीएच्या घाऊक मच्छी मार्केटमधील किरकोळ मासळी विक्रीला पोलिसांकडून आवर घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी पोलिसांनी कोलवा रस्त्याबाजूला मासळी विक्री करणार्‍या महिलांना दंड केला.
एसजीपीडीए मार्केटमधील किरकोळ मासळी विक्रीवर एसजीपीडीएकडून कारवाई केली जाईल. मात्र, मार्केट बाहेरील किरकोळ मासळी विक्रेत्यांवर कारवाईचे अधिकार एसजीपीडीएला नसल्याचे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी स्पष्ट केले आहे. मार्केटबाहेरील रस्त्यावर मासळी विक्री करणाऱ्यांवर मडगाव पालिकेकडून कारवाई व्हावी, अशी मागणी होत असतानाच पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे.
एसजीपीडीएच्या किरकोळ मच्छी मार्केटमधील विक्रेत्यांनी घाऊक मच्छी मार्केट व रस्त्यावर किरकोळ मासळीची विक्री केली जात असल्याने किरकोळ मच्छी मार्केटमधील विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार केली होती. डिसा यांनी घाऊक मच्छीमार्केट सकाळी नऊ वाजता बंद करण्याचे व किरकोळ मासळी विक्रेत्यांवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर मार्केटमधील किरकोळ मासळी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आता मार्केट बाहेरील कोलवा व नुवेकडे जाणार्‍या रस्त्यांच्या बाजूला ही मासळीची किरकोळ विक्री केली जात असल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांनी या विक्रेत्यांवर दंडाची कारवाई सुरू केली आहे व मार्केटमध्ये सकाळी ९ वाजल्यानंतर किरकोळ मासळी विक्री करणार्‍यांना पोलिस उठून जायला सांगत आहेत.
एसजीपीडीएच्या घाऊक मच्छी मार्केट बाहेर अनेक ट्रक व छोटे टेम्पो थांबलेले असतात. मार्केटमधूनच विकत घेतलेली मासळी काही विक्रेते या रस्त्याशेजारील गाड्यांच्या बाजूलाच उभे राहून विक्री करत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो व परिसरातही अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे कोलवा व वेळ्ळीकडे जाणार्‍या रस्त्यांवर होणार्‍या किरकोळ मासळी विक्रीवर बंदी आणण्यासाठीही पोलिस प्रशासनाने पावले उचलली आहेत. तीन दिवसांपासून दररोज कारवाई सुरू असून रस्त्याशेजारी मासळी विक्री करणार्‍या विक्रेत्यांना पोलिस १०० रुपये दंड आकारून यापुढे विक्री न करण्याच्या सूचना करत आहेत. पोलिसांनी रस्त्यांशेजारी मासळी विक्री करणार्‍या व्यक्तींवर कारवाईची ही मोहीम अशीच सुरू ठेवल्यास विक्रेत्यांवर आवर आणणे शक्य होणार आहे.