पर्वरीत आधार कार्डच्या कार्यालयाची दयनीय अवस्था

भिंती, सीलिंगमधून झिरपते पाणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd September 2020, 11:29 pm

पर्वरी : पर्वरी येथील राज्य शिक्षण संस्थेच्या (एस.आय.ई) इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर असलेल्या आधार कार्ड कार्यालयाची अवस्था फारच दयनीय झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे या इमारतीच्या भिंती आणि कार्यालयातील सीलिंगमधून चक्क पाणी आत ठिबकत आहे. जेव्हा मोठा पाऊस पडतो तेव्हा पाणी कॉरिडोरमध्ये येते. त्यामुळे लोकांना या साचलेल्या पाण्यात उभे राहवे लागत आहे.
दरम्यान, हे कार्यालय दुसर्‍या मजल्यावर असल्यामुळे आणि लिफ्टची सुविधा नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पायर्‍या चढून आधारकार्ड कार्यालयात जाणे अवघड होत आहे. पर्वरी येथील सय्यद नसिरूद्दीन नामक व्यक्तीने याविषयी बोलताना सांगितले की, अापण मंगळवारी (दि. २२) कार्यालयात गेलाे असता या इमारतीतील सर्व पायर्‍या ओल्या झाल्या होत्या आणि छपरातून पाणी झिरपत होते. कार्यालयाच्या कॉरिडोरमध्ये पाणी साचले होते. कॉरिडोर स्वच्छ न केल्यामुळे निसरडा झालेला होता. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हे कार्यालय दुसर्‍या चांगल्या इमारतीत तळमजल्यावर हलविणे गरजेचे आहे, असेही नसिरुद्दीन यांनी सांगितले.
सदर इमारत सरकारी मालकीची असून तिचे व्यवस्थित देखभाल होत नाही. या इमारतीच्या तळमजल्यावर विषेश मुलांची शाळा आहे. तर पहिल्या मजल्यावर गोवा सर्व शिक्षा अभियानची कचेरी आहे. या इमारतीत लोकांची सतत ये-जा चालू असते. सरकारने या प्रकरणात लक्ष घालून तातडीने या इमारतीची दुरुस्ती करावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.