Goan Varta News Ad

‘स्वयंपूर्ण गोवा’ २ पासून : मुख्यमंत्री

सेवा सप्ताह समारोपानिमित्त भाजपची व्हर्च्युअल रॅली

|
21st September 2020, 12:26 Hrs
‘स्वयंपूर्ण गोवा’ २ पासून : मुख्यमंत्री

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : राज्यात दूध, चिकन तसेच भाज्यांच्या उत्पादनात रोजगार आणि व्यापाराची मोठी संधी आहे. याचा लाभ घेण्यासाठी २ ऑक्टोबरपासून राज्यात ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. भाजपच्या सेवा सप्ताहाच्या समारोपानिमित्त रविवारी आयोजित व्हर्च्युअल सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे देशभरात सेवा सप्ताह राबवण्यात आला. या सप्ताहात गोव्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. या सभेला प्रमुख वक्त या नात्याने प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास धेंपो उपस्थित होते. करोनातून बरे झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रथमच सभेला संबोधित केले. ते पुढे म्हणाले, आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. आत्मनिर्भर भारतप्रमाणेच गोवाही स्वयंपूर्ण झाला पाहिजे. राज्यात दूध, चिकन, भाज्या यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाऊ शकते. गोव्यातील तांदळावर बंगळुरात प्रक्रिया केली जाते. आता ती गोव्यात झाली पाहिजे. व्होकल फॉर लोकलचे पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. आता तशी कृती केली पाहिजे.

पंतप्रधनांनी सुरू केलेल्या विविध योजनांचा गोमंतकीयांनाही मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे.

प्रमुख वक्ते उद्योजक श्रीनिवास धेंपो म्हणाले, भारताला आत्मनिर्भर करण्यासह प्रगतिपथावर नेण्याचे पंतप्रधानांनी स्वप्न पाहिले आहे. ते सत्यात उतरवण्यासाठीच त्यांनी स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया, आयुष्मान भारत, उजाला आदी योजना सुरू केल्या आहेत. हे करत असताना त्यांनी देशाच्या सीमांकडेही लक्ष दिले आहे. सर्जिकल स्ट्राईकद्वारे त्यांनी शेजारी देशांना इशारा दिला आहे. कोणाचीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत नाही. अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान यांसह विविध देशांची भारतासोबत घनिष्ठ मैत्री आहे. यावेळी त्यांनी मोदींसोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला.

माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्वागत केले. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

वेळीच लॉकडाऊनमुळे नुकसान कमी : श्रीनिवास धेंपो 

करोनाचे आगमन होताच पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार, याची त्यांना कल्पना होती. या निर्णयावरून त्यांच्यावर टीका होत असली तरी तो त्यावेळी आवश्यकच होता. लॉकडाऊन केले नसते तर आतापेक्षा तिप्पट नुकसान झाले असते.

- श्रीनिवास धेंपो, उद्योजक