Goan Varta News Ad

संस्कार एका आईचे

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर दा. जोशी |
20th September 2020, 01:06 Hrs
संस्कार एका आईचे

हे उदाहरण आहे, माझ्या वाचनात आलेल्या एका संस्कारक्षम आईचे. मुलाच्या जडणघडणीत आईचा वाटा मोलाचा असतो आणि आईच आपल्या मुलांना योग्य प्रकारे घडवू शकते हे या उदाहरणावरून पटावे. एम्. टेक. होऊनही नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या कमाईतले दहा हजार रुपये गुंतवून पतीला स्वतंत्र उद्योग करायला प्रोत्साहित केले. दहा हजार रुपये घालून सुरु केलेला व्यवसाय थोड्याच वर्षात कोट्यवधींचा व्यवहार करू लागला. हाताखाली शे- शंभर माणसं काम करू लागली. पण, बाई तत्वनिष्ठ होत्या. व्यवसायात मिळालेला पैसा हा समाजाचा आहे आणि तो समाजाला या ना त्या स्वरूपात मिळाला पाहिजे या तत्वाच्या. त्यामुळे मालक असूनही कंपनीत त्या व पती इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे नोकरी करत व मिळालेल्या वेतनातून घरसंसार चालवीत. 

बाई सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे राहत असल्या तरी त्यांच्या कंपनीचे नाव झालेले असल्याने त्यांना समाजात चांगलाच मान होता. एकदा त्यांचा मुलगा रोहन शाळेतून आल्यावर सांगू लागला, "अम्मा, आज वर्गातल्या एका मित्राचा वाढदिवस होता. मित्राच्या वडिलांनी आम्हा सर्वांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली. इतकं मस्त होतं ते हॉटेल. खूप मजा आली. माझा पण, वाढदिवस तिथेच साजरा करूया ना!" त्यावर अम्मा काहीच बोलल्या नाहीत. कारण कोणी कोणाचा वाढदिवस कसा साजरा करायचा, त्यासाठी किती पैसे खर्च करायचे हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून असते.

अम्मा काहीच बोलत नाही हे पाहून रोहनने त्यांना पुन्हा ढोसले. त्यावर अम्मा म्हणाल्या, "हे बघ बेटा रोहन, आपल्याला तसा वाढदिवस साजरा नाही करायचा." त्यावर नाराज होत त्याने विचारले, "पण का?" अम्मा म्हणाल्या, "हे बघ रोहन. आपण खर्चाचा विचार करू. त्या हॉटेलमध्ये प्रत्येक मुलामागे किमान एक हजार रुपये लागतील. तुझ्या वर्गात पन्नास मुलं आहेत. म्हणजे एकूण किती झाले? पन्नास हजार. आपल्या कंपनीतल्या ड्रायव्हरला दोन मुलं आहेत. ती तुझ्यासारखीच हुशार आहेत. पण, ती चांगल्या शाळेत जाऊ शकत नाहीत, कारण त्या शाळेची दहा हजार रुपये फी त्याला परवडणार नाही. तू पन्नास हजार रुपये खर्च करून एक दिवस साजरा करशील. पण, त्यातले वीस हजार रुपये त्या मुलांना दिले तर त्यांत त्या दोघांचं आयुष्य उजळून निघेल. दहा हजार रुपयात तुला छोट्या प्रमाणात वाढदिवस साजरा करता येईल. उरलेल्या पैशांचा योग्य तो उपयोग कर. तुला काय वाटते ते मला सांग." 

मुलगाही समंजस होता. दोन दिवस विचार करून त्याने सांगितले, 'अम्मा, तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण त्या मुलांना पैसे देऊया." अम्मांनी त्या ड्रायव्हरला बोलावून घेतले आणि रोहनच्या हस्तेच वाढदिवसाची भेट म्हणून त्या मुलांना ते पैसे दिले. ड्रायव्हरच्या डोळ्यातून ओघळलेल्या अश्रूंचा आनंद हॉटेलमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या पार्टीच्या आनंदापेक्षा कैक पटीने अधिक होता. 

अम्मा आणि त्यांचे पती कंपनीत उच्च पदावर असल्याने कंपनीच्या प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी तसेच अन्य कामासाठी कर्मचारी होते. पण, अम्मांवर लहानपणीच स्वावलंबनाचे संस्कार झालेले असल्याने प्रत्येकाने स्वावलंबी असावे यावर त्यांचा कटाक्ष होता. जेवण झाले की त्या स्वतः आपली ताट, वाटी साफ करत. तीच सवय त्यांनी मुलांना लावली. समाजकार्यासाठी त्या प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी क्षेत्रात जात. जाताना बरोबर रोहनला नेत. त्याला तिथल्या लोकांची विपन्नावस्था दाखवत. राहायला नीट घर नाही, अंगभर वस्त्र नाही, दोन वेळचं पोटभर अन्न नाही, इच्छा असूनही मुलांना शिकता येत नाही. रोहन हे सर्व पाहत होता, शिकत होता आणि त्याचबरोबर घडतही होता. 

एकदा त्या रोहनबरोबर समानता या विषयावर चर्चा करत होत्या. परिस्थिती एखाद्याला मोठं करते पण त्यामुळे बाकीची माणसं लहान होत नाहीत. सर्व माणसं सारखीच असतात आणि आपण त्यांचा मान राखला पाहिजे. असा साधारण चर्चेचा विषय होता. अचानक रोहनने विचारले, "अम्मा, आपण जेवताना डायनींग टेबलवर बसून जेवतो, पण आपले स्वयंपाकी मात्र किचनमध्ये बसून जेवतात. त्यांनीही डायनींग टेबलवर बसून जेवायला काय हरकत आहे? " रोहनच्या या प्रश्नाने अम्मा क्षणभर स्तंभित झाल्या. त्याच्या या प्रश्नाचे त्यांना कौतुक वाटले आणि त्या म्हणाल्या, "रोहन, तुझं बरोबर आहे. आजपासून आपले सर्व कर्मचारी आपल्या टेबलावर बसूनच जेवतील." संस्कारातून मुलं घडतात ती अशी. 

पुढे रोहन शिक्षणासाठी परदेशात गेला. तिथे त्याला एक लाख रुपयांची स्कॉलरशीप मिळाली. योगायोगाने त्याच वेळी रोहनचा वाढदिवसही येत होता. रोहन या पैशांचे काय करेल याचा विचार करत असतानाच रोहनने ते पैसे अम्माकडे पाठविले आणि सांगितले की, "हे पैसे  लष्करातल्या जवानांच्या मदतनिधीला दे. ते तिथे आहेत म्हणून आपण आज सुरक्षित आहोत. पुढे त्याने लिहिले, अम्मा मला तुझा अभिमान वाटतो. कारण माझी अम्मा केवळ माझीच नव्हे तर इतरांच्याही मुलांची काळजी घेते. अशी आई मिळायला भाग्य लागते." रोहनच्या या वाक्याने अम्मा विलक्षण भारावल्या. आपण केलेल्या संस्कारांचे चीज झाले या विचारांनी त्या सुखावल्या.   

आधी केले मग सांगितले या विचारांने त्या वागल्या. कोट्यवधींचा व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या त्या मालकीण असूनही मालकीण म्हणून न राहता विश्वस्त म्हणून राहिल्या. नियमानुसार मिळणाऱ्या मानधनात संसार चालविला. कंपनीची गाडी असूनही स्वतः भाजी आणण्यासाठी रिक्षाने जात. मुलाला इतर मुलांबरोबर स्कूलबसने पाठवीत. स्वतः फक्त सुती साड्या नेसत. आदिवासी भागात जाताना एस. टी. ने किंवा प्रसंगी चालत जात. मागास जातीतील, देवदासी समाजातील स्त्रियांना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्यातला आत्मविश्वास जागा केला. या विदुषी आहेत, सर्व जगात प्रसिद्ध असलेल्या इन्फोसिस या कंपनीच्या संचालक सौ. सुधा मूर्ती! एक कर्तृत्ववान महिला आणि संस्कारक्षम माता. 

(लेखक साहित्यिक आहेत.)